पाकिस्तानला मिळाली अझरबैजानची साथ
भारत-आर्मेनिया शस्त्रास्त्र करारामुळे बिथरला
वृत्तसंस्था/ बाकू
अझरबैजानने पुन्हा एकदा पाकिस्तानसाठीचे स्वत:चे प्रेम दाखविले आहे. काश्मीरसंबंधी आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही याप्रकरणी पाकिस्तानचे समर्थन करतो. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावांच्या अंतर्गत आम्ही तोडगा इच्छितो. हे पूर्ण दक्षिण आशियातील शांततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे भारतातील अझरबैजानचे राजदूत अशरफ शिकालियेव्ह यांनी म्हटले आहे.
अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह यांनी यापूर्वीच उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले होते. अलीयेव्ह यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतच्या बैठकीत काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन दर्शविले होते. काश्मीर मुद्द्यावर अझरबैजान नेहमीच पाकिस्तानसोबत असल्याचे अलीयेव्ह यांनी म्हटले हेते.
भारत-आर्मेनिया संबंधांमुळे नाराज
ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानातील अझरबैजानचे राजदूत खजर फरहादोव यांनी काश्मीरप्रश्नी आम्ही जाहीरपणे पाकिस्तानचे समर्थन करतो अशी भूमिका मांडली होती. पाकिस्तानने देखील अझरबैजानशी निगडित मुद्द्यांवर त्याला अनुकूल अशी भूमिका घेतली आहे. मागील काही काळापासून अझरबैजान पाकिस्तान आणि तुर्कियेसोबतची जवळीक सातत्याने वाढवत आहे. अझरबैजानचे आर्मेनियासोबतचे शत्रुत्व जगजाहीर आहे. मागील काही वर्षांपासून भारत आणि आर्मेनियाचे संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. भारताकडून आर्मेनियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येत आहे. अझरबैजानचे अध्यक्ष अलीयेव्ह यांनी आर्मेनियाला शस्त्रास्त्र पुरवठा केल्याप्रकरणी भारताच्या विरोधात संताप देखील व्यक्त केला आहे.