भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाईहद्द बंदीत वाढ
वृत्तसंस्था, इस्लामाबाद
पाकिस्तानने भारतीय विमानांना स्वत:च्या हवाईक्षेत्रात प्रवेश करण्यास घातलेली बंदी आणखी वाढवली आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणानुसार ही बंदी आता 24 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. ही बंदी सैन्यविमानांनाही लागू असेल.
पाकिस्तानने 23 एप्रिल 2025 रोजी पहिल्यांदा भारतीय विमानांसाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद केले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. भारतानेही पाकिस्तानी विमानांना स्वत:च्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर तणावात वाढ
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा आरोप भारताने केला होता. मात्र पाकिस्तानने हा आरोप फेटाळला होता. यानंतर पाकिस्तानच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून भारताने 30 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद केले.. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी निर्बंध लागू ठेवल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
भारतीय विमानो•ाणांचा मार्ग लांबला
हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे भारतातून युरोप, मध्यपूर्व आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक विमानांना पर्यायी आणि लांब मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे काही उ•ाणांचा प्रवास कालावधी सुमारे 45 मिनिटांपासून दोन तासांपर्यंत वाढू शकतो. याचा परिणाम इंधनखर्च, विमानांचे वेळापत्रक आणि प्रवाशांच्या प्रवास कालावधीत होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानलाही स्वत:च्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या परदेशी विमानांकडून मिळणाऱ्या ‘ओव्हरफ्लाइट’ शुल्काच्या संभाव्य महसुलावर परिणाम सहन करावा लागत आहे.