For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहव्वूर राणामुळे पाकिस्तानचा पर्दाफाश?

06:36 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
तहव्वूर राणामुळे पाकिस्तानचा पर्दाफाश
Advertisement

एनआयए चौकशीत अनेक रहस्ये येणार उघड्यावर

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार आणि मूळचा पाकिस्तानचा असणारा तहव्वूर राणा याची सध्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाकडून (एनआयए) कसून चौकशी होत आहे. या चौकशीत त्याने आतापर्यंत कोणती स्फोटक माहिती दिली, हे आताच उघड केले जाणार नाही, हे स्पष्ट आहे. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या माहितीतून पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्यातील सक्रीय सहभाग उघड होत आहे. केवळ पाकिस्तानातील दहशतवादी संघटनाच नव्हे, तर प्रत्यक्ष पाकिस्तानी प्रशासनाचा या कटात कसा सहभाग होता, यावरही प्रकाश पडत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर एनआयएकडून सादर होणाऱ्या आरोपपत्रासंबंधी साऱ्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.

Advertisement

हा हल्ला 2008 मध्ये, अर्थात तब्बल 17 वर्षांपूर्वी झाला होता. आज 17 वर्षांच्या नंतर प्रथम भारताच्या हाती या हल्ल्याच्या कटाचा एक प्रमुख सूत्रधार लागला आहे. त्यामुळे नेमका कट कसा शिजला, कोणी शिजविला आणि पाकिस्तान आणि भारतातील नेमके कोणकोण या कटात सहभागी होते, ही सर्व माहिती प्रत्यक्ष सूत्रधाराकडूनच भारताला मिळण्याची ही प्रथमच वेळ आहे. त्यामुळे तहव्वूर राणा जे बोलेल ते या घटनेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे आहे.

पाकिस्तान प्रशासनाचा सहभाग

मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानातील लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेचा स्पष्ट सहभाग होता, ही बाब आता पुरेशी सिद्ध झालेली आहे. पण पाकिस्तानच्या त्यावेळच्या प्रशासनाचा हात यात किती आणि कसा होता, याची ‘फर्स्ट हँड’ माहिती भारताजवळ इतके दिवस नव्हती. या सहभागासंबंधी केवळ अनुमाने व्यक्त केली जात होती. पण तहव्वूर राणा यासंबंधी स्पष्ट आणि सत्य माहिती देऊ लागला असून पाकिस्तानला उघडे पाडत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

कसाब आणि जिंदाल

यापूर्वी भारताने या हल्ल्यातील जिवंत हाती सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्यावर कारवाई केली असून त्याला मृत्यूदंड दिला आहे. तसेच याच हल्ल्याशी संबंधित दहशतवादी अबू जिंदाल याचे सौदी अरेबियातून प्रत्यार्पण करुन घेऊन त्याचीही चौकशी केली आहे. तथापि, हे दोघे या कटातील कनिष्ठ भागीदार होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्यक्ष कटाची विशेष माहिती मिळाली नाही. आता प्रथमच अशी व्यक्ती भारताच्या हाती लागली आहे, ती जिला या कटाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. ते भारताला मिळाल्यास पाकिस्तानची जागतिक पातळीवर नाचक्की होणार, हे निश्चित मानले जात असून एनआयएच्या तपासाची दिशा तीच आहे.

इतर सूत्रधार हाती नाहीत

या हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हीड कोलमन हॅडली आणि  लष्करे तोयबाचे म्होरके हाफिझ सईद, झकी-उर-रहमान लखवी तसेच आयएसआयचा अधिकारी इक्बाल ऊर्फ साजीद मीर हे आहेत. यांच्यापैकी कोणीही भारताच्या हाती लागला नाही. पण या सर्व दहशतवाद्यांनी जे काही केले, त्याची पूर्ण माहिती तहव्वूर राणा याला आहे. त्यामुळे आपण उघडे पडणार या भीतीने पाकिस्तानने आता राणाशी आपला संबंध नाही, असा कांगावा करण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, तज्ञांच्या मते, घटना इतक्या पुढे गेल्या आहेत, की पाकिस्तान आपली जबाबदारी झटकू किंवा टाळू शकणार नाही

परिणाम काय होणार...

ड तहव्वूर राणा याने पाकिस्ताच्या प्रशासनाला उघडे पाडल्यास पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याच्या वास्तवाचे सत्यापन होणार आहे.

ड पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखी मलीन होणार असून त्याची विश्वासार्हताही रसातळाला पोहचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ड यापुढच्या काळात पाकिस्तानकडे पाहण्याची साऱ्या जगाची दृष्टी संशयाची राहणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती आणखी बिघडणार आहे.

ड भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर ठपका ठेवला होता, तो खरा ठरणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची मान आणखी खाली जाणार आहे.

ड या हल्ल्यात भारतातील कोणाचा, किती जणांचा आणि असा सहभाग होता, याचीही माहिती उघड झाल्यास या व्यक्तीही उघड्या पडतील.

Advertisement
Tags :

.