For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासह पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल

06:51 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतासह पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल
Advertisement

आशिया चषक महिला टी-20 स्पर्धा : वर्मा, शर्माची चमक, राधा-अरुंधतीचे प्रत्येकी 2 बळी, नेपाळवर 82 धावांनी मात

Advertisement

वृत्तसंस्था/डंबुला

सामनावीर शेफाली वर्माचे अर्धशतक तसेच दिप्ती शर्माच्या जादुमय फिरकीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारच्या सामन्यात नेपाळचा 82 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या गटातून पाकनेही उपांत्य फेरी गाठली आहे. शर्मा आणि वर्मासमोर नेपाळचा संघ हतबल ठरला. वर्माने 81 धावांचे योगदान दिले तर शर्माने 13 धावांत 3 गडी बाद केले. या गटातून उपांत्य फेरी गाठण्यासाठी नेपाळला पाकला धावसरासरीत मागे टाकण्यासाठी भारताचे उद्दिष्ट 10 षटकांत गाठणे गरजेचे होते. पण त्यांना 9 बाद 96 धावांच जमविता आल्याने पाकचे शेवटच्या चारमधील स्थान निश्चित झाले.

Advertisement

शेफाली वर्मा, डी हेमलता आणि रॉड्रिग्ज यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकात 3 बाद 178 धावा जमविल्या. स्पर्धेतील मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेफाली वर्मा आणि हेमलता या सलामीच्या जोडीने 14 षटकात 122 धावांची शतकी भागिदारी केली. हेमलताने 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 47 धावा झोडपल्या. शेफाली वर्माने 48 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 81 धावा झळकविल्या. नेपाळच्या मगरने हेमलताला तर त्यानंतर शेफाली वर्माला बाद केले. रॉड्रिग्जने 15 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 28 धावा झळविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली सजना केवळ 10 धावांवर बाद झाली. जोशीने तिला पायचित्त केले. रिचा घोषने 1 चौकारांसह नाबाद 6 धावा जमविल्या.

भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात भारताने 50 धावा जमविल्या. शेफाली आणि हेमलता यांनी अर्धशतकी भागिदारी 35 चेंडूत तर शतकी भागिदारी 63 चेंडूत नोंदविली. शेफालीने 26 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह अर्धशतक झळकविले. भारताने 10 षटकाअखेर बिनबाद 91 धावा जमविल्या होत्या. भारताचे दीड शतक 107 चेंडूत फलकावर लागले. नेपाळतर्फे सीता राणा मगरने 25 धावांत 2 तर कविता जोशीने 36 धावांत 1 गडी बाद केला. नेपाळच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय फलंदाजांना अनेक जीवदाने मिळाली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना नेपाळने 20 षटकात 9 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली. सलामीच्या सीता राणा मगरने 22 चेंडूत 3 चौकारांसह 18, कर्णधार इंदू बर्माने 18 चेंडूत 2 चौकारांसह 14, रुबिना छेत्रीने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15, तर बिंदू रावलने 19 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 17 धावा जमविल्या. नेपाळच्या डावात 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दिप्ती शर्माने 13 धावांत 3 तर अरुंदती रे•ाrने 28 धावांत 2, राधा यादवने 12 धावांत 2 गडी बाद केले. रेणूकासिंग ठाकुरने 1 बळी मिळविला. नेपाळने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 31 धावा जमविताना 2 गडी गमविले. नेपाळचे अर्धशतक 61 चेंडूत फलकावर लागले.

संक्षिप्त धावफलक: भारत 20 षटकात 3 बाद 178 (शेफाली वर्मा 81, हेमलता 47, सजना 10, रॉड्रिग्ज नाबाद 28, घोष नाबाद 6, अवांतर 6, मगर 2-25, जोशी 1-36), नेपाळ 20 षटकात 9 बाद 96 (मगर 18, बर्मा 14, छेत्री 15, रावल नाबाद 17, अवांतर 8, दीप्ती शर्मा 3-13, राधा यादव 2-12, रे•ाr 2-28, रेणूकासिंग 1-15

Advertisement
Tags :

.