पाकिस्तानकडून उघड युद्धाची घोषणा
अफगाणिस्ताननेही केले पाकिस्तानवर जोरदार हल्ले : 133 जणांचा बळी गेल्याचा दावा
वृत्तसंस्था / काबूल, इस्लामाबाद
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रात्री उशिरापासून घनघोर युद्धाला प्रारंभ झाला आहे. रमझानचा पवित्र महिना असतानाही पाकिस्तानने अफगाणिस्तानाच्या अनेक शहरांना आपल्या वायुहल्ल्याचे लक्ष्य बनविले आहे. या हल्ल्यात 133 जणांचा बळी गेल्याचा दावा पाकिस्तानने केला, तर आमचे कोणीही दगावलेले नाहीत, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. अफगाणिस्ताननेही थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाच लक्ष्य केले आहे. पाकिस्तानचे एक एफ 16 विमान पाडल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे. या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे 55 सैनिक ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.
गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या वायुदलाने अफगाणिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या शहरांवर बॉम्बफेक केली. त्याआधी अफगाणिस्तानने दोन्ही देशांमधील ड्यूरँड सीमारेषेवरील पाकिस्तानच्या सैनिक चौक्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या 14 चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा अफगाण सेनेने केला आहे. या हल्ल्यांमध्ये किमान 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. या घटनेच्या आधी चार दिवस पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. आता पाकिस्तानने उघड युद्धाची घोषणा केल्याने परिस्थिती चिघळली असून, हे युद्ध अत्यंत घातक पद्धतीने लढले जाईल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
काबूल, कंदाहार लक्ष्य
पाकिस्तानने रात्रभर अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार आणि पक्तिया या शहरांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यांमध्ये अफगाण सैनिकांचे काही बंकर्स उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तथापि, तो अफगाणिस्तानने फेटाळला आहे. पाकिस्तानने निरपराध अफगाण नागरिकांच्या वस्त्यांवर हल्ले केले आहेत, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानने रात्री अन्य स्थानी आणखी हल्ले केले आहेत.
अफगाणिस्तानकडूनही वायुहल्ले
पाकिस्तानच्या वायुहल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननेही पाकिस्तानवर वायुहल्ले केल्याचा दावा आहे. अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाच लक्ष्य केले. त्याशिवाय, अबोटाबाद, नौशेरा आणि जामरुद येथील पाकिस्तानी लष्करी ठाण्यांवरही आमच्या वायुदलाने हल्ले केले आहेत. पाकिस्तानची आम्ही मोठी हानी केली आहे, असे प्रतिपादन अफगाणिस्तानकडून करण्यात आले. अफगाणिस्तानच्या या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांना आश्चर्य वाटत आहे. कारण अफगाणिस्तानकडे वायुहल्ला करण्यासाठी योग्य असणारी साधने किंवा विमाने नाहीत, अशी आजवरची समजूत होती. मात्र, अफगाणिस्तानचा वायुहल्ल्याचा दावा खरा असेल, तो देशही वायुहल्ले करण्यासाठी सक्षम आहे, असे सिद्ध होणार आहे. पाकिस्तानच्या अनेक लष्करी ठाण्यांची या हल्ल्यात मोठी हानी झाली आहे, असा दावा अफगाणिस्ताकडून करण्यात आला.
दोन्ही देशांमध्ये वाद कोणता...
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष अनेकदा झाला आहे. मागच्या वर्षीही दोन्ही देश युद्धाच्या स्थितीपर्यंत पोहचले होते. त्यावेळी सौदी अरेबियाने मध्यस्थी करुन दोघांना चर्चेच्या मेजावर आणले होते. तथापि, चर्चेतून तोडगा निघाला नाही. या दोन्ही देशांमध्ये सीमारेषेचा वाद आहे. सध्या ड्यूरँड रेषेने हे दोन देश एकमेकांपासून वेगळे केले आहेत. पण अफगाणिस्तानला ही रेषा मान्य नाही. आपल्या देशातील पठाणबहुल भाग या रेषेमुळे पाकिस्तानला देण्यात आला आहे, असे या देशाचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांताचा मोठा भाग मूळचा अफगाणिस्तानचा आहे, असाही दावा अफगाणिस्तान करतो. या सीमावादामुळे हे संघर्ष होत असतात.
मोठे हल्ले, बाँबफेक
ड दोन्ही देशांचे एकमेकांवर मोठे वायुहल्ले, हानीसंबंधी परस्परविरोधी दावे
ड अफगाणिस्तानचे थेट इस्लामाबादवरच वायुहल्ले, अन्य शहरांनाही लक्ष्य
ड पाकिस्तानचे 55 सैनिक ठार केल्याचा दावा, अनेक चौक्यांवर कब्जा
ड पाकिस्तानचे अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंदाहार शहरांवर हल्ले