For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात पुन्हा एअरस्ट्राइक

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचा अफगाणिस्तानात पुन्हा एअरस्ट्राइक
Advertisement

9 जण ठार : मुले-महिलांचा मृतांमध्ये समावेश : चालू वर्षात 11 व्यांदा हवाईहल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/काबूल

पाकिस्तानने गुरुवारी अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेलमंड प्रांतात एअरस्ट्राइक केला आहे. या हल्ल्यांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे अफगाण तालिबान राजवटीकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी हल्ल्यामंध्ये दोन्ही प्रांतांमधील अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिली. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आतापर्यंत 11 वेळा एअरस्ट्राइक केला आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 800 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानात गुरुवारी दोन ठिकाणी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले असून यात कमीतकमी 22 दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर तालिबानने पाकिस्तानच्या या हल्ल्यांची निंदा केली. पाकिस्तानने चुकीचे कृत्य केले आहे. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे वक्तव्य तालिबानचे प्रवक्ते मुजाहिद यांनी केले.

Advertisement

संयमाची परीक्षा पाहू नये

पाकिस्तानने अफगाणी लोकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. पाकिस्तानने अफगाणिस्तानचा इतिहास लक्षात ठेवावा. अफगाणिस्तानात सोव्हियत महासंघ आणि अमेरिका यासारख्या मोठ्या शक्ती देखील युद्धानंतर यशस्वी ठरू शकल्या नाहीत, असे उद्गार तालिबान सरकारमधील मंत्री नूरुल्लाह नूरी यांनी काढले आहेत.

तणावात वाढ

तहरीक-ए- तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) सदस्यांनी अफगाणिस्तानच्या पक्तिया व नांगरहार प्रांतामधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सीमेवर दोन्ही बाजूंदरम्यान गोळीबार झाला. अफगाणिस्तानातून ड्रोनही डागण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. यापूर्वी पाकिस्तानने सोमवारी अफगाणिस्तानात एअरस्ट्राइक केला होता, ज्यात 28 जण मृत्युमुखी पडले होते.

Advertisement
Tags :

.