पाकिस्तानी लष्कराचा ‘टीटीपी’ला मोठा धक्का
दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी मुल्ला मुनीरचा खात्मा
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानी सैन्याने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) दुसऱ्या क्रमांकाचा नेता मारल्याचा दावा केला आहे. कारी अहमद उर्फ मुफ्ती मुजाहिम याचा खात्मा केल्याने पाकिस्तानी सैन्याला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुफ्ती मुजाहिम हा टीटीपीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. त्याने गटाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते. मुफ्ती मुजाहिम हा टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूदचा उजवा हात मानला जात होता. नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेने त्याला स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट (एसडीजीटी) म्हणून घोषित केले होते. तो टीटीपीच्या नेतृत्व परिषदेचा सदस्य देखील होता. तसेच मागील बरीच वर्षे टीटीपी गटाचा उपप्रमुख म्हणून काम करत होता.
29 आणि 30 ऑक्टोबरच्या रात्री खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिह्यात गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाईदरम्यान कारी अमजद उर्फ मुफ्ती मुजाहिम मारला गेल्याचे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) या पाकिस्तानी लष्कराच्या प्रचार शाखेने म्हटले आहे. मुजाहिम सध्या बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिणेकडील जिह्यांमध्ये आणि दक्षिण पंजाबमध्ये एका ऑपरेशनल नेटवर्कचे नेतृत्व करत होता. त्याची हत्या पाकिस्तानी सुरक्षा दलांनी टीटीपी नेतृत्वाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातो.
बाजौर जिह्यातील सुरक्षा दलांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. यादरम्यान, आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न प्रभावीपणे उधळून लावला. याप्रसंगी अचूक आणि कार्यक्षम चकमकीत टीटीपी नेता आणि एक प्रमुख लक्ष्य असलेल्या अमजद उर्फ मजहिमसह चार दहशतवादी मारले गेल्याचे ‘आयएसपीआर’ने एका निवेदनात म्हटले आहे.
चकमकीत मारला गेलेला टीटीपी कमांडर मुफ्ती मुजाहिम फितना अल-खवारीजच्या रेहबारी शूराचा प्रमुख होता. पाकिस्तानने त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित केले होते. अफगाणिस्तानात राहून पाकिस्तानमध्ये विविध दहशतवादी कारवाया करण्यात सक्रियपणे सहभागी असल्यामुळे सरकारने त्याच्यावर 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.