अफगाणिस्तानात पाकिस्तानचे हवाई हल्ले
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पाकिस्तानी वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी रात्री अफगाणिस्तानात शिरून भीषण हवाई हल्ले पेले आहेत. अफगाणिस्तानात 4 ठिकाणी तहरीक-ए-तालिबान म्हणजेच टीटीपीच्या दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्त्र अन् बॉम्ब पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला. या हल्ल्यांमध्ये 25-30 दहशतवादी मारले गेल्याचे पाकिस्तानचे सांगणे आहे. तर तालिबानने हवाई हल्ल्यात 46 नागरिक मारले गेल्याचा आरोप केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, अशी घोषणा तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे.
पाकिस्तानने हा हल्ला अफगाणिस्तानच्या पाकटीका प्रांतात केला आहे. पाकटीका प्रांताच्या बेरनाल जिल्ह्यात मुर्घा आणि लामन भागात टीटीपीच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या तळांचा वापर टीटीपी कमांडर शेर जमान, कमांडर अबू हमजा, अख्तर मुहम्मद आणि टीटीपीची उमर मीडिया करत होती असा दावा पाकिस्तानने केला.
पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे तालिबानचे संरक्षणमंत्री मुल्ला याकूब यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने हा हल्ला मंगळवारी स्वत:च्या प्रतिनिधीला तालिबानकडे पाठविल्यावर आणि त्याने तालिबानचा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानीशी चर्चा केल्यानंतर घडवून आणला आहे.
तालिबान आणि पाक यांच्यात सुमारे 1 वर्षाच्या कालावधीनंतर चर्चा झाली होती. पाकिस्तानचे अफगाण विषयक विशेष प्रतिनिधी मोहम्मद सादिक यांनी तालिबानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्ताकीशी चर्चा केली होती. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात सध्या तणाव आहे. पाकिस्तानी सैन्यावर टीटीपी दहशतवादी सातत्याने हल्ले करत आहेत. या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळाल्याचे पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे. तर हे दहशतवादी पाकिस्तानातच लपून बसले असल्याचे तालिबानचे सांगणे आहे.