पाक-तालिबान चर्चा निर्णयाविना संपुष्टात
वृत्तसंस्था/ इस्तंबूल
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील इस्तंबूलमध्ये आयोजित बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपुष्टात आली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची धमकी देऊनही या बैठकीत कोणताही करार झाला नाही. या बैठकीत सीमा तणाव, टीटीपी, अफगाण निर्वासित आणि व्यापारी मुद्यांवर चर्चा झाली. याचदरम्यान, सीमापार लष्करी कारवाई अफगाण अमिरातीवर हल्ला मानली जाईल, असे तालिबानने जाहीर केले आहे.
तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील जवळजवळ नऊ तासांची बैठक कोणत्याही औपचारिक कराराशिवाय संपली. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धर्तीवर दबावाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. इस्तंबूलमध्ये तालिबानशी झालेल्या बैठकीपूर्वी त्यांनी जर बैठक अनिर्णीत राहिली तर पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ला करेल, असा इशारा दिला होता. तरीही बैठक अनिर्णीत ठरली आहे.