सरकारी शाळांमधून चित्रकला विषय गायब
2008 पासून चित्रकला शिक्षकांची नेमणूकच नाही
बेळगाव : विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच कला जोपासण्यासाठी वाव देणे गरजेचे आहे. परंतु मागील 17 वर्षांपासून राज्यात कला शिक्षकांची नियुक्तीच झाली नसल्याने विद्यार्थी चित्रकलेपासून दूर गेले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होताना दिसत आहे. 2008 पासून राज्यात एकाही चित्रकला शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 3414 सरकारी शाळा आहेत. परंतु या शाळांमध्ये स्वतंत्र कला शिक्षक नाहीत. त्या ऐवजी 201 विशेष (व्यावसायिक) शिक्षक आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना बागकाम, शिवणकाम, संगीत, नृत्य, नाट्या हे विषय शिकवतात. ज्या सरकारी शाळांची पटसंख्या 450 हून अधिक आहे. अशा शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक केली जाते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 85 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 137 तर उर्वरित माध्यमिक विभागात विशेष शिक्षक आहेत. बेळगावमधील 1356 शाळांमध्ये चित्रकला शिक्षक नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेची गोडी राहिलेली नाही. पूर्वी शाळांमध्ये प्रत्येक वर्गात चित्रकला हा विषय घेण्यात येत होता. यामुळे अभ्यासातून विरंगुळा मिळण्यासोबतच कलेला वाव मिळत होता. सध्या प्रतिभा कारंजीसह अनेक स्पर्धा घेण्यात येतात. परंतु सहकार्य करण्यास शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत नाही.
लिलावती हिरेमठ (जिल्हा शिक्षणाधिकारी)
पटसंख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये शारिरीक शिक्षकांची भरती केली जात आहे. परंतु चित्रकला शिक्षकांची भरती केली जात नाही. चित्रकला शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कोणतीही माहिती नाही. ज्या शाळांमध्ये पटसंख्या अधिक होती. त्या शाळांमध्ये यापूर्वी कलाशिक्षक भरून घेतले जात होते.