‘एआय’ने शोधले पेंटिंग
कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा एआय हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. सध्या मानव करत असलेली अनेक कामे एआय करीत आहे. तसेच भविष्यकाळात आणखी जटील कामेही एआयच्या माध्यमातून केली जातील, अशी शक्यता आहे. याची चुणूक एका घटनेमधून दिसून आली आहे. इटलीच्या चर्चमधून 22 वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक आणि अनमोल पेंटिंगची चोरी झाली होती. चोरांनी या पेंटिंगमधील धार्मिक चिन्हे पुसून टाकून ते कोणालाही ओळखता येणार नाही, अशी व्यवस्था केली होती. या पेंटिंगची विक्री करुन भक्कम पैसे कमाविण्याचा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे, त्यांनी एका मेळ्यात हे पेंटिंग विक्रीसाठी ठेवले. हे पेंटिंग 11 ऑगस्ट 2004 या दिवशी चोरीला गेले. ते सेंट अॅग्नेस नामक एका ख्रिश्चन संताचे पेंटिंग होते. हे पेंटिंग ओळखता येऊ नये, म्हणून त्यात अनेक परिवर्तने करण्यात आली. या पेंटिंगचे मूळचे सौंदर्य बिघडू नये, अशा प्रकारे हे बदल करण्यात आले होते. या संताच्या मुखाभोवतीची प्रभावळ पुसण्यात आली होती. तसेच पार्श्वभूमीचा रंगही वेगळा देण्यात आला होता. हे पेंटिंग ज्याने त्याच्या मूळ स्वरुपात पाहिले आहे, त्यालाही ते आता ओळखात येऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मूळच्या पेंटिंगचे छायाचित्र या पेंटिंगच्या बाजूला ठेवले, तरी लक्षात येऊ नये, अशा प्रकारचे परिवर्तन कौशल्याने करण्यात आले.
पोलीस सातत्याने या पेंटिंगचा शोध घेत होते. एका मेळ्यात ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे, अशी गुप्त माहिती हाती लागताच या मेळ्यात शोधकार्याचा प्रारंभ करण्यात आला. कोणालाही शोधकार्य होत आहे, हे लक्षात येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली. अन्यथा ते पेंटिंग लपविण्यात आले असते. मात्र, या पेंटिंगचे स्वरुप इतके वेगळे करण्यात आले होते, की त्याचा शोध जवळजवळ अशक्य बनला होता, अशा वेळी कृत्रिम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मूळच्या पेंटिंगची जी छायाचित्रे उपलब्ध होती, ती एआय साधनांमध्ये समाविष्ट करण्यात आली. या एआय साधनाने मेळ्यात ठेवलेल्या या चोरलेल्या मूळ पेंटिंगचा अचूक शोध घेतला. नंतर हे पेंटिंग चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे एआयचा उपयोग गुन्हेगारी क्षेत्रातही होणे शक्य आहे.
