पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानात मोकाट
भारताविरोधात उघडपणे गरळ ओकतोय : पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीगकडून आयोजित सभेत उपस्थित
वृत्तसंस्था/लाहोर
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि पहलगाम येथील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरीला जाहीर सभेत पाहिले गेले आहे. सभेत पाकिस्तानातील राजकीय नेते आणि अन्य वाँटेड दहशतवादी देखील सामील झाले होते. या रॅलीत प्रक्षोभक भाषणं आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीगने ही रॅली आयोजित केली होती, यात भारताच्या विरोधात गरळ ओकण्यात आली. यात लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा पुत्र आणि भारताकडून दहशतवादी घोषित तल्हा सईद देखील सामील झाला होता.
माझ्यावर पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता माझे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे असे सैफुल्लाहने पंजाब प्रांताच्या कसूर येथे आयोजित सभेत बोलताना म्हटले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा कट सैफुल्लाह कसूरीनेच रचला होता, असे मानले जाते. पर्यटकांना लक्ष्य करत झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हा दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ने घडवून आणला होता.
बहावलपूरच्या इलाहाबादमध्ये ‘मुदस्सिर शहीद’ नावाने एक सेंटर, रस्ता आणि रुग्णालय निर्माण करणार असल्याचे कसूरीने जमावाला संबोधित करताना म्हटले आहे. मुदस्सिर अहमद हा भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारले गेलेल्या अनेक हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांपैकी एक होता, असे गुप्तचर सूत्रांचे सांगणे आहे. या सभेला भारताच्या वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत 32 व्या स्थानावर असलेल्या तल्हा सईदने भारताच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करत घोषणाबाजी केली. पीएमएमएलला लष्कर-ए-तोयबाकडून मोठे समर्थन मिळते आणि याला दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी मानले जाते.
पाकिस्तानच्या शहरांमध्ये भारतविरोधी रॅली
पीएमएमएलने भारतविरोधी वक्तव्यांना धार दिली आहे. हा पक्ष पाकिस्तानच्या लाहौर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद इत्यादी ठिकाणी निदर्शने करत हाफिज सईदच्या मुक्ततेची मागणी करत आहे. लष्कर-ए-तोयबा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंधित संघटना आहे आणि दबावामुळे पाकिस्तानने देखाव्यापोटी यावर बंदी घातली आहे. परंतु संघटनेने पीएमएमएल सारख्या राजकीय संघटनांचे रुप धारण करत स्वत:ची राजकीय प्रासंगिकता कायम ठेवली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार, संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित दहशतवादी हाफिज सईदच पीएमएमएलच्या कारवायांमागे असल्याचे मानले जाते. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते, त्यातील अनेक लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. भारताच्या हल्ल्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सिर अहमद यासारखे वाँटेड दहशतवादी मारले गेले, हे आयसी-814 विमान अपहरण आणि पुलवामा येथील आत्मघाती स्फोटाच्या कटात सामील होते.