Pahalgam Attack Analysis : पहलगाम : विचारपूर्वक कृती हवी
भारताकडून अशी कोणतीही पावले उचलली जाण्यापूर्वी काही गोष्टी विचारपूर्वक करायला हव्यात
By : डॉ. यशवंत थोरात
भारताचे नंदनवन असलेले काश्मिर गेले अनेक दिवस शांतता अनुभवत होते. मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी हा शांतता भंग केली. अंदाधुंद गोळीबार करत त्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. आपल्या पतीच्या पार्थिवाशेजारी बसलेल्या नववधूचे छायाचित्र समाज माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आणि दहशतवाद्यांच्या क्रूर, अमानवी कृत्याचा देशभरात निषेध होऊ लागला. त्यासोबतच या घटनेच्या सूत्रधारांना धडा शिकवा, अशी जोरदार मागणी होऊ लागली.
शत्रूराष्ट्र पाकिस्तानविरोधात वातावरण तापले आहे. भारताकडून अशी कोणतीही पावले उचलली जाण्यापूर्वी काही गोष्टी विचारपूर्वक करायला हव्यात, असे मला वाटते. अशा प्रकारची घटना घडू शकते, याची कल्पना गुप्तचर यंत्रणेला नव्हती. मात्र सोशल मीडियावरून तसे संकेत देण्यात आले होते. या घटनेनंतर मीडियाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे काश्मीरमधील सर्वधर्मियांनी या घटनेचा एकमताने निषेध केला. त्याला मात्र तुलनेत कमी कव्हरेज देण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर आता भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी सर्वांचीच भावना आहे. घडलेल्या घटनेला जबाबदार कोण आहे, याचे उत्तर एका रात्रीत देता येणार नाही. चौकशी अहवाल येईपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल. आपल्याला सांगण्यात आले की गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारला. त्यांना कलमा वाचण्यास सांगितले, हे खरे आहे का? सत्य काहीही असो, प्रमुख समुदायांमध्ये फूट पाडणे हेच पाकिस्तानला हवे आहे. आपल्या कोणत्याही कृतीने पाकिस्तानला हवे ते मिळणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपली एकता अखंड ठेवणे आपले कर्तव्य आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
भारत पाकिस्तानपेक्षा लष्करीदृष्ट्या श्रेष्ठ आहे. परंतु युद्धाच्या वाटेवर जाणे दोन्हीही बाजूंना परवडणारे नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. तुलनेत आपली अर्थव्यवस्था रुळावर आहे. मात्र सामान्य माणसावर युद्ध लादल्यानंतर जी आर्थिक फरपट होईल, ती आपल्याला परवडणारी नाही.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ज्याला युद्ध म्हणता येणार नाही, अशी प्रतिबंधात्मक कारवाई भारताने करावी. सिंधूच्या पाण्यावरील निर्बंध सुरू ठेवावेत, पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे. पाकिस्तानवर निर्बंध लादण्यास आंतरराष्ट्रीय समुदायाला भाग पाडावे. देशातील हिंदू आणि मुस्लिमांमधील तणाव कमी करावा, जो पाकिस्तानला हवा आहे.
भारत काय करू शकतो?
- सीमेपलिकडचा दहशतवाद या शब्दावर आपण बंदी घातली पाहिजे. कारण त्यामुळे अशा कृतीची जबाबदारी पाकिस्तानच्या खांद्यावरून अज्ञात दहशतवाद्यांकडे सोपवली जाते. त्याऐवजी आपण राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या हे स्पष्ट केले पाहिजे, की नियंत्रण रेषेपलिकडून होणारी कोणतीही कृती ही शत्रुत्वाची कृती मानली जाईल. ज्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. यामागील उद्देश म्हणजे, त्याला असा धडा शिकविणे, की तो भविष्यात दहशतवादाला बळच पुरवू शकणार नाही.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले राजकीय वजन वापरून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र किंवा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश म्हणून घोषित करावे.
- याशिवाय आपण अमेरिकेला पाकिस्तानवर निर्बंध लादण्यास भाग पाडले पाहिजे. ज्यामुळे पाकिस्तानचे आधीच खालावलेली अर्थव्यवस्था खिळखिळी होईल.
- पाकिस्तानचे वर्तन सुधारत नाही, तोपर्यंत आपण त्यांचे सिंधू नदीचे पाणी बंद करण्याचे धाडस केले पाहिजे.
- माझ्या मते आपण युद्ध घोषित करू नये. आपण तसे केले, तर आपण जिंकू याबद्दल तीळमात्रही शंका नाही. मात्र यानंतर हताश पाकिस्तान अणुबॉम्बचे बटण दाबेल, अशी मला भीती वाटते. यदाकदाचित तसे झालेच, तर दक्षिण आशिया त्या आगीत जळून खाक होईल.