पद्मश्री कमला पुजारी यांचे हृदयविकाराने निधन
वयाच्या 70 व्या वषी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था /कटक
पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी (वय 70 वर्षे) यांचे कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. ऊग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांना तब्येतीच्या त्रासामुळे एससीबी ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमला पुजारी यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी शोक व्यक्त केला आहे. पद्मश्री कमला पुजारी यांनी देशी धानाचे वाण आणि इतर बियाणांचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे हे कार्य ओडिशा आणि देश कधीही विसरू शकत नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
कोरापूट जिह्यातील दुर्गम खेड्यातील आदिवासी महिला कमला पुजारी यांनी सेंद्रिय शेती सुरू केली होती. पारंपारिक बियाण्यांचे जतन केले होते. त्यांनी आदिवासींमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून पारंपरिक बियाण्यांचे जतन आणि लागवड करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली होती. 2018 मध्ये राज्य नियोजन मंडळाच्या सदस्य बनलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला होत्या. याच कारणामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कमला पुजारी या ओडिशातील कोरापूट येथील रहिवासी होत्या. त्यांनी 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड’ जिंकून राज्याचे नाव उंचावले होते.