पद्मश्री अर्थतज्ञ डॉ. विवेक देवरॉय यांचे निधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक देवरॉय यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. एम्स दिल्लीने जारी केलेल्या निवेदनात त्यांना आतड्यांसंबंधी संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्री पुरस्कार विजेते देवरॉय हे नीति आयोगाचे सदस्यही होते. नवीन पिढीसाठी त्यांनी सर्व पुराणांची इंग्रजीत भाषांतरे केली आहेत.
डॉ. देवरॉय यांचे प्रारंभिक शिक्षण कोलकाता येथील नरेंद्रपूर येथील रामकृष्ण मिशन शाळेत झाले. यानंतर त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये 1987 च्या सुमारास सेवा बजावली होती. यानंतर 1987 ते 1993 या काळात त्यांनी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन टेडचा कार्यभार सांभाळला. 1993 मध्ये ते वित्त मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या प्रकल्पाचे संचालक बनले. हा प्रकल्प भारतातील कायदेशीर सुधारणांवर केंद्रित होता. 1998 पर्यंत ते या विभागाचे संचालक होते.
पंतप्रधानांची श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. विवेक देवरॉय हे एक तल्लख विद्वान होते. अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि इतर विविध क्षेत्रात ते पारंगत होते. सार्वजनिक धोरणातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त त्यांनी आमच्या प्राचीन ग्रंथांवर काम करणे आणि ते तऊणांसाठी सुलभ बनवणे देखील कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.