पद्मश्री पुरस्कार विजेत्या वृक्षमाता तुळसी गौडा यांचे निधन
कारवार : वृक्षमाता पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुळसी गौडा (वय 86) यांचे सोमवारी अंकोला तालुक्यातील होन्नळ्ळी येथील स्वगृही वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना जंगलाच्या एनसायक्लोपेडिया म्हणून ओळखले जात होते. गेल्या कांही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मागासलेल्या हालक्की व वक्कलिग समाजात जन्मलेल्या तुळसी गौडा यांच्या पतीचे निधन लहान वयातच झाले. संसाराची धुरा सांभाळण्यासाठी त्या वनखात्याच्या सेवेत टेम्पररी मजूर म्हणून रुजू झाल्या. तब्बल 57 वर्षे वनखात्यात सेवा बजावली. बालपणापासूनच त्यांचे वृक्षांवर प्रेम होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात लाखो झाडांची लागवड करून त्यांची मुलाप्रमाणे काळजी घेतली. वेगवेगळ्या झाडांची बियाणे जमा करून रोपटी तयार करण्याचा छंद त्यांनी जोपासला होता.
जंगलातील सुमारे 300 झाडांचे ज्ञान त्यांना होते. हे ज्ञान त्यांनी विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य केले. पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेऊन 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना इंदिरा गांधी प्रदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार बहाल केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे अंकोला तालुक्यात आयोजन केले होते. त्यावेळी मोदी यांनी तुळसी गौडा यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, कारवार भाजप उपाध्यक्षा माजी आमदार रुपाली नाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.