For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकाच्या विजयात पडिकलचे शतक

06:27 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकाच्या विजयात पडिकलचे शतक
Advertisement

त्रिपूराचा 80 धावांनी पराभव, स्मरण, मनोहर यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था / अहमदाबाद

विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील इलाईट अ गटातील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात देवदत्त पडिकलचे दमदार शतक तसेच रविचंद्रन स्मरण व अभिनव मनोहर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कर्नाटकाने त्रिपुराचा 80 धावांनी पराभव केला. पडिकलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात कर्नाटकाला 4 गुण मिळाले. त्यामुळे आता कर्नाटकाचा संघ या स्पर्धेच्या अ गटात गुणतक्त्यात पाच सामन्यांतून 20 गुणांसह आघाडीवर आहे.

Advertisement

शनिवारच्या सामन्यात त्रिपुराने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजी दिली. कर्नाटकाने 50 षटकांत 7 बाद 332 धावा जमविल्या. त्यानंतर त्रिपुराचा डाव 49 षटकांत 252 धावांत आटोपला. स्वप्नील सिंगचे शतक मात्र वाया गेले.

कर्नाटकाच्या डावात सलामीच्या पडिकलने 120 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 108 धावा झळकविताना स्मरण समवेत तिसऱ्या गड्यासाठी 136 धावांची शतकी भागिदारी केली. स्मरणने 82 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावा झळकविल्या. केएल राहुलने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा जमविताना पडिकल समवेत चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भर घातली. पडिकल पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाला. अभिनव मनोहरने आक्रमक फटकेबाजी करताना 43 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 79 धावा झोडपल्या. श्रेयस गोपालने 15 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावा केल्या. त्रिपुरातर्फे अभिजित सरकारने चार गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्रिपुराचा निम्मा संघ 59 धावांत तंबूत परतला. पण रजत डे आणि स्वप्नील सिंग यांनी सहाव्या गड्यासाठी 107 धावांची शतकी भागिदारी केली. रजत डेने 5 चौकारांसह 66 धावा जमविल्या. सरकारने 1 चौकारांसह नाबाद 26 धावा केल्या. स्वप्नील सिंगने 93 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 100 धावा झळकविल्या. 49 षटकांत त्रिपुराचा डाव 252 धावांवर आटोपला. कर्नाटकातर्फे विजयकुमार विशाख आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. विद्याधर पाटील, श्रीशा अचार्य, प्रसिद्धकृष्णा प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: कर्नाटक 50 षटकांत 7 बाद 332 (पडिकल 108, स्मरण 60, अभिनव मनोहर नाबाद 79, केएल राहुल 35, श्रेयस गोपाल 29, सरकार 4-50), त्रिपुरा 49 षटकांत सर्वबाद 252 (स्वप्नील सिंग 100, रजत डे 66, तेजस्वी जयस्वाल 25, सरकार नाबाद 26, विजयकुमार विशाख आणि श्रेयस गोपाल प्रत्येकी 3 बळी).

Advertisement
Tags :

.