पाचगाव ग्रामस्थांची पाणी बिलातील लूट थांबवा ! शिवसेना ठाकरे गटाची मागणी
शिवसेनेची पाचगाव ग्रामपंचायत कडे निवेदना द्वारे मागणी
पाचगाव वार्ताहर
पाचगाव परिसरात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असताना पाणी बील मात्र भरमसाठ येत आहे. पाणी बिलातून होणारी लूट थांबवून परिसरातील ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी पाचगाव ग्रामपंचायत कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पाचगाव परिसरात जल जीवन योजने मधून नवीन पाण्याची पाईप टाकली आहे. अशा ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे मोठी पाईप टाकण्यात यावी. ग्रामस्थाना स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा करावा. पाचगाव ग्रामस्थांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येतो, पाईपलाईनला लागलेल्या गळती मुळे अनेक वेळ हा पाणी पुरवठा खंडित होतो. म्हणजे पाचगाव ग्रामस्थांना दोन महिन्यात अंदाजे 20 ते 25 दिवस अपुरा पाणीपुरवठा होतो. असे असताना दोन महिन्याचे पाणी बील मात्र पाचशे ते आठशे रुपये येत आहे.यातून ग्रामस्थांची लूट सुरु आहे. ज्या भागात पाईप लाईन गळती मुळे पाणी येत नाही अशा भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतने टँकरने पाणी पुरवठा करावा, प्रिंटेड बिला ऐवजी पूर्वी सारखीच बिले द्यावीत, ग्रामस्थांना पुरेसा पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदना द्वारे पाचगाव ग्रामपंचायत कडे करण्यात आली. हे निवेदन उपसरपंच सचिन पाटील, ग्रामसेवक संदीप पाटील यांना देण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना करवीर तालुका उप प्रमुख विवेक काटकर,विभाग प्रमुख अभिजित पोरे, संतोष ओतारी, अविनाश माळी, साहिल अत्तार, स्वप्नील बारटक्के यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.