For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पी.व्ही. सिंधूचे लक्ष्य सलग तिसऱ्या पदकावर

06:13 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पी व्ही  सिंधूचे लक्ष्य सलग तिसऱ्या पदकावर
Advertisement

ऑलिम्पिक बॅडमिंटन आजपासून : सात्विक-चिराग पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे शुक्रवारी येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. प्रत्येक चार वर्षांनी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सलग तिसरे ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. तर पुरूष दुहेरीत भारताचे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही टॉपसिडेड जोडी पदार्पणातच ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisement

पी. व्ही. सिंधूने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्य पदक तर तत्पूर्वी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकाविले होते. सिंधूचे लक्ष्य आता सलग तिसऱ्या ऑलिम्पिक पदकावर राहिल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराला शनिवारपासून प्रारंभ होत आहे.

पुरूष दुहेरीमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने चालु वर्षाच्या प्रारंभी फ्रान्समध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी भारताची महिला बॅडमिंटनपटू आश्विनी पोनाप्पा हिची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत ती महिला दुहेरी तनिषा क्रेस्टो समवेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन हे पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. पुरूष एकेरीत प्रणॉय आणि सेन यांच्यात प्राथमिक गटातील क्रॉस टप्प्यात गाठ पडू शकेल. 2024 च्या बॅडमिंटन हंगामात सात्विक आणि चिराग यांनी दोन स्पर्धा जिंकल्या असून चार स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. तसेच त्यांनी थॉमस चषक जिंकला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या जोडीने सुवर्णपदक तर 2022 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्यपदक मिळविले आहे. या जोडीने दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थानही मिळविले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत या जोडीने सुवर्ण पदके घेतली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरूष दुहेरीच्या बॅडमिंटन प्रकारात सात्विक आणि चिराग या जोडीला तृतिय स्थान देण्यात आले असून त्यांचा  क गटामध्ये समावेश आहे. अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील पुरूष दुहेरीतील विजेती जोडी इंडोनेशियाची फझर अल्पियान व मोहम्मद आरिदिंतो तसेच जर्मनीची जोडी लेम्सफस व सिडेल, फ्रान्सची जोडी कोर्व्ही आणि लेबर यांचाही क गटात सहभाग आहे. सात्विक आणि चिराग यांनी इंडोनेशियाच्या अल्फियान व आरिदिंतो यांचा यापूर्वी झालेल्या तीन सामन्यामध्ये पराभव केला आहे. तसेच त्यांनी जर्मनीच्या लेम्सफस व सिडेल या जोडीचा एकदा पराभव केला आहे. फ्रान्सच्या कोर्व्ही व लेबर यांचा सात्विक आणि चिराग यांनी यापूर्वी दोनवेळा पराभव केला आहे.आपल्या गटातून सात्विक आणि चिराग आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करतील. बॅडमिंटनच्या या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकासाठी चीनची टॉपसिडेड जोडी लियांग केंग व चँग त्याच प्रमाणे कोरियाची जोडी हेयुक व जेई हे प्रमुख दावेदार आहेत.

2023 च्या बॅडमिंटन हंगामात पी.व्ही. सिंधूला वारंवार दुखापतीने चांगलेच दमविले होते. 2022 साली तिच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. ती दुखापत बरी होण्यास तिला सहा महिने बॅडमिंटनपासून अलिप्त रहावे लागले होते. गल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात तिला गुडघा दुखापतीने चांगलेच दमविले. महिला एकेरीच्या प्रकारात तिला यंग, फेई, यांग आणि कॅरोलिना मॅरिन यांच्याकडून कडवा प्रतिकार राहिल. पी. व्ही. सिंधू 2024 च्या बॅडमिंटन हंगामात सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याने तिला पदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.तसेच नशीबाची साथही महत्वाची राहिल. मलेशियाचे हशीम हे पी.व्ही. सिंधूचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. सिंधूचे प्राथमिक गटातील सामने इस्टोनियाच्या कुबा आणि मालदिवच्या फातिमा रझाकबरोबर होतील. त्यानंतर तिला पुढील फेरीमध्ये चीनच्या बिंगजाओ आणि ऑलिम्पिक चॅम्पियन चेन फेईशी लढत द्यावी लागेल.

पुरूष एकेरीत भारताचा लक्ष्य सेन याला सिडींग देण्यात आलेले नाही. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याला आपले जेतेपद राखता आले नाही. इंडोनेशीयाच्या जोनातन ख्रिस्टीकडून लक्ष्य सेनला हार पत्करावी लागली होती. लक्ष्य सेनला एकेरीची उपांत्यफेरी गाठावयाची असेल तर त्याला केव्हिन कोर्डोन आणि बेल्जियमच्या कॅरेगीचा पराभव करावा लागेल.

Advertisement
Tags :

.