For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पी. एन. पाटलांचा स्वॅग...विरोधकांमध्येही क्रेझ...! पण अकाली एक्झीटमुळे कार्यकर्ता पडला एकाकी

07:09 PM May 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
पी  एन  पाटलांचा स्वॅग   विरोधकांमध्येही क्रेझ     पण अकाली एक्झीटमुळे कार्यकर्ता पडला एकाकी
Advertisement

अभिजीत खांडेकर

पी. एन. पाटील म्हटलं की समोर येते ती व्यक्तीमत्वाला साजेशी पांढरी शुभ्र कपडे, प्रसन्न चेहरा आणि डौलदार चाल. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पी.एन. साहेब अशी नावाने परिचित असलेल्या पांडूरंग निवृत्ती पाटील यांनी आज अखेर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अकाली एक्झीटने कोल्हापूरातील काँग्रेस कार्यकर्त्यालाच नाही तर जिल्हयातील सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांना याचा मोठा धक्का बसला आहे....!

Advertisement

करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावचा एक तरूण बुलडोझर व्यवसायामध्ये उतरला. चिकाटीमुळे व्यवसायात यश प्राप्त करून इतर वेळेत अनेक लोकांना मदतीचा हात देताना राजकारणात उतरला. ज्या काळात रस्ते आणि वाहतूकीची साधने फार उपलब्ध नव्हती त्या काळात तो गावागावात गारव्यासाठी समोर एक फॅन असेलेल्या आपल्या फियाट गाडीमधून सफारी ड्रेस घालून फिरायचा. काही वर्षातच त्याने आपली ओळख पी. एन. पाटील अशी निर्माण केली. आपल्या उभ्या आयुष्यात अनेक राजकिय आणि संस्थात्मक पदे सांभाळणारे पांडुरंग निवृती पाटील यांना जनतेने दिलेली पी. एन. साहेब ही सुद्धा एक पदवीच होती आणि ती त्यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहीली.

डौलदार पी. एन. पाटीलांचा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच स्वॅग होता. पांढरी शुभ्र कपडे घातलेले आणि हसतमुखाने पी. एन. पाटील गाडीतून खाली उतरताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येत असे. एका फोनवर आपली अडचण दुर करणारे पी. एन. साहेबांनी आपल्या घरच्या कार्यक्रमाला यावं यासाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता धडपडायचा...

Advertisement

फक्त काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच नाही तर विरोधकांमध्येही पी. एन. पाटीलांची क्रेझ होती. आपल्या नेत्याची खुषमस्करी करताना पी.एन. पाटलांचं गुणगाण गाताना त्यांचे विरोधकही कधीच थकले नाहीत. जिल्ह्यातील राजकारणांमध्ये सर्वात कट्टर आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या पी.एन. पाटील गटाला आपल्या नेत्यावर विरोधकांनी केलेली टिका कधीच रूचली नाही. त्यामुळे विरोधकांनीही पी.एन. पाटील यांच्यावर कधीही वैयक्तीक टिका केली नाही.

आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीलेल्या आमदार पी.एन. पाटील यांनी आपल्या एकनिष्ठतेचा मानदंड निर्माण केला आहे. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्ष अनेक अडचणीतून जात असताना पक्षाच्या अनेक नेत्यांनी अगदी माजी मुख्यमंत्र्यांनी देखिल रामराम ठोकला. अशा वेळी पी.एन. पाटील यांनी पक्षाबरोबर ठाम राहून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिपस्तंभासारखे काम केले. आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांना देखिल पक्ष शिस्तीबरोबर एकनिष्ठतेचे धडे दिले. त्यामुळे करवीर तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात पी.एन. पाटील यांच्या कार्यकर्ता नेहमीच काँग्रेसबरोबर उभा राहीला.

Advertisement
Tags :

.