For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेतील नौदल सरावात ‘पी-8आय’चा जलवा

06:13 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील नौदल सरावात ‘पी 8आय’चा जलवा
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली, हवाई

इंडो-पॅसिफिक प्रदेशात भारताची भूमिका सातत्याने मजबूत होत असल्याचे संकेत भारतीय नौदल जगाला पुन्हा एकदा दाखवून देत आहे. नौदलाचे अत्याधुनिक लांब पल्ल्याचे सागरी टेहळणी आणि पाणबुडीविरोधी विमान, ‘पी-8आय’ अमेरिकेतील हवाई द्विप समूहावरील होनोलुलु येथे दाखल झाले आहे. हे विमान जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय नौदल सरावांपैकी एक असलेल्या ‘रिम्पॅक 2026’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

Advertisement

भारतीय नौदलाचे हे विमान जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय नौदल सराव ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ (रिम्पॅक-2026) मध्ये सहभागी होईल. हा सराव 1 जुलैपासून सुरू झाला असून तो 31 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय नौदलाने या सहभागाला ‘मैत्रीच्या पुलांचे प्रतीक’ म्हटले आहे. या सरावात सहभागी होऊन, भारतीय नौदलाने इंडो-पॅसिफिक प्रदेशातील आपली वाढती सामरिक भूमिका आणि क्षमतांचा स्पष्ट संदेश दिला आहे. नौदलाच्या मते, हा सहभाग मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिकसाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी करतो. या सरावातील सहभागामुळे मित्रराष्ट्रांच्या नौदलांसोबत आंतरकार्यक्षमता, सागरी निगराणी आणि परिचालन सहकार्य देखील मजबूत होईल.

‘पी-8आय’ : सागरी सुरक्षेचा आधारस्तंभ

‘पी-8आय’ विमान हे भारताच्या सर्वात प्रगत सागरी युद्ध क्षमतांपैकी एक आहे. ‘पी-8आय’ विमान हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म असून ते दूर पल्ल्याची सागरी निगराणी, पाणबुडी शोधणे, गुप्त माहिती गोळा करणे आणि सागरी सुरक्षा कारवाया करण्यास सक्षम आहे. शिवाय, हे विमान समुद्रातील संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवू शकते आणि आवश्यकतेनुसार त्वरित कारवाईसाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवू शकते. यामुळेच हिंद महासागर प्रदेशात भारताच्या सागरी सुरक्षेचा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो.

‘रिम्पॅक’ म्हणजे काय?

रिम्पॅक हा जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. यामध्ये अनेक देशांच्या नौदलांचा सहभाग असतो. सागरी सुरक्षा, पाणबुडीविरोधी युद्ध, हवाई संरक्षण, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण, चाचेगिरीविरोधी मोहीम आणि सुरुंग निकामी करणे यांसारख्या गुंतागुंतीच्या कारवायांचा सराव केला जातो. या सरावाद्वारे भारत मित्र राष्ट्रांसोबत आधुनिक युद्धतंत्र, सामरिक अनुभव आणि संयुक्त परिचालन क्षमता अधिक मजबूत करत आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात चाच्यांचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला. आयएनएस त्रिखंड या युद्धनौकेने एमव्ही गोल्डन आर्सेनल या मालवाहू जहाजाची सुटका केली. भारतीय नौदलाची ही सक्रिय भूमिका प्रादेशिक सागरी सुरक्षेतील त्याचे वाढते योगदान अधोरेखित करते.

Advertisement
Tags :

.