आठ लाखांची ऑक्सिजन पाईप वसंतदादा सर्वोपचारमधून चोरीस
सांगली :
शहरातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातून सुमारे आठ लाख रुपयांची तांब्याची ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य चोरीस गेले आहे. ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता शिवाजी गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात वर्षभरापासून रूग्णालयाची डागडुजी आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या वर्षभरातच सुमारे पंधराशे मीटरची 9 एमएम जाडीची तांब्याची ऑक्सिजन पाईप आणि इतर तत्सम साहित्य चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. पाईप आणि यंत्रसामग्री सुमारे आठ लाख रुपयाची असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयाच्या भोंगळपणाचा कारभार यातून समोर आला आहे. इतक्या मोठ्या लांबीची पाईप चोरट्यांने चोरून कशी नेली याबाबत तर्कवितर्क सुरू आहे. तसेच ही पाईप चोरी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत झाली आहे. त्यामुळे शासकीय साहित्याकडे रूग्णालय प्रशासनाचे किती बारकाईने लक्ष आहे हे यावरून समोर आले आहे. या चोरीप्रकरणांत अनेकाचा हात असल्याचीही चर्चा रूग्णालयाच्या आवारात दबक्या आवाजात सुरू आहे.