पंजाबमध्ये ऑनर किलिंग
वडिलांनी मुलीसह प्रियकराला संपविले : आरोपीचे आत्मसमर्पण
वृत्तसंस्था/अमृतसर
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. दोघांचेही धारदार शस्त्राने गळे कापल्याचे उघड झाले आहे. मृतांची ओळख पटली असून जोबनदीप सिंग (24) रा. काकर गाव आणि सुखप्रीत कौर (22) रा. बोपराई अशी त्यांची नावे आहेत. हत्येनंतर आरोपीने रक्ताने माखलेल्या हातांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
आरोपीने प्रथम दोघांना प्रचंड मारहाण करत त्यांना विजेचे धक्के दिले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचे गळे कापले. हे प्रकरण ऑनर किलिंगशी संबंधित आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घृणास्पद ऑनर किलिंगमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात दु:ख आणि संतापाचे वातावरण आहे. प्रेमात पडल्याबद्दल कोणालाही अशी शिक्षा देऊ नये असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
जोबनदीप आणि सुखप्रीत हे दोघेही प्रेमसंबंधात होते. रविवारी, 1 जून रोजी ते घरातून पळून गेले होते. सोमवारी दोघेही कोर्ट मॅरेजसाठी अमृतसरच्या न्यायालयात पोहोचल्यानंतर एका नातेवाईकाने त्यांना पाहिले आणि लगेच कुटुंबीयांना माहिती दिली. यासंबंधी माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून लग्नाच्या बहाण्याने दोघांनाही घरी आणले. पण दोघेही घरी पोहोचताच त्यांना एका खोलीत बंद करून बेदम मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारहाणीनंतरही दोघेही वाचल्यानंतर त्यांना विजेचा धक्का देण्यात आला. यानंतरही जेव्हा त्यांचा मृत्यू झाला नाही, तेव्हा मुलीचे वडील गुरदियाल सिंग यांनी धारदार शस्त्राने दोघांचाही गळा कापल्याचे निदर्शनास आले आहे.
मुख्य आरोपी पोलिसांसमोर शरण
हत्येनंतर आरोपी गुरदियाल सिंग रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये काही वेळ घराजवळ फिरत राहिला. त्यानंतर त्याने थेट रामतीर्थ पोलीस ठाण्यात पोहोचत आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आरोपीने आधीच आत्मसमर्पण केले असले तरी या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे काय? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.