कोगे गायरानातील रातोरात अतिक्रमण; गावात तणावाचे वातावरण
कसबा बीड :
कोगे (ता. करवीर) येथील गायरान गट क्रमांक 739 मध्ये एका रात्रीत सिमेंटचे खांब उभे करून नव्याने अतिक्रमण झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच याच गटावर जुने अतिक्रमण झालेले असताना, पोलीस बंदोबस्त येण्याआधीच नव्याने अतिक्रमण वाढवले गेल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गटावर याआधीही झोपड्या, शेड, टपऱ्या, सिमेंट खांब याच्या माध्यमातून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावेळी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आले होते. अतिक्रमण धारकांची यादी, 7/12 उतारे व फोटोंसह आवश्यक कागदपत्रे तयार करून संबंधित तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवली होती.
मात्र, गुरुवारी मध्यरात्री काही लोकांनी पुन्हा एकदा सिमेंटचे खांब उभारून आपली हद्द निश्चित करत गट नंबर 739 मध्ये नव्याने अतिक्रमण केले. यामुळे सामान्य नागरिक फक्त पाहात राहिले आणि गावात अस्वस्थता वाढली. पोलिस बंदोबस्ताअभावी ही कारवाई थांबवता आली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीची तातडीने बैठक
गुरुवारी रात्रीच्या अतिक्रमणानंतर ग्रामपंचायतीने तात्काळ मिटिंग बोलावून सदर घटनास्थळाचे फोटो घेतले. अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन अतिक्रमण हटवण्यासाठी ठराव करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्रे पाठवण्यात आली आहेत. पोलिस बंदोबस्ताची तारीख मिळताच अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी श्री. डी. के. आंबेकर यांनी दिली.