आडारी मार्गावरील झाडी हटविली; वीजवाहिन्यांनी घेतला मोकळा श्वास
मालवण : शहरातील देऊळवाडा-आडारी मार्गालगत वाढलेल्या झाडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच झाडांच्या फांद्या व वेली वीजवाहिन्यांवर येऊन घासत असल्याने आडारी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.
वीजवाहिन्यांवरील झाडी हटविण्याची मागणी करूनही संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर नगरसेविका नीना मुंबरकर यांनी पुढाकार घेतला. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी, जेसीबी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी देऊळवाडा-आडारी मार्गावरील अडथळा ठरणारी झाडी हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेमुळे रस्त्यालगतची वाढलेली झाडी हटविण्यात आली असून, वीजवाहिन्यांना वेलींनी घातलेला वेढाही दूर झाला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग अधिक मोकळा झाला असून, वीजवाहिन्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
या मोहिमेत नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम वळंजू यांच्यासह सफाई कर्मचारी तसेच मोहन फाटक, मुन्ना फाटक, बाळू फाटक, समीर फाटक, निलेश शिरोडकर, संदीप गावकर, मिलिंद फाटक, विद्याधर फाटक, संजय गावकर, अक्षय नाटेकर, हरी भोजणे, आदित्य चव्हाण आदी स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
नगरसेविका नीना मुंबरकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल आडारी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या समस्या याच पद्धतीने तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.