एकीच्या बळावर संकटावर मात!
यंदाच्या पावसाच्या लहरीपणाने जलसमृद्ध कोकणसमोरच पाणीटंचाईचे आव्हान उभे केले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची जाणीव होताच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने जलसंधारणाची लोकचळवळ उभी केली. या चळवळीचे फलित म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 हजार 500 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात 12 हजार 500 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत सात हजार बंधारे पूर्ण झाले आहेत.
लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर उभी राहिलेली ही मोहीम कोकणच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडविणारी ठरली आहे. मात्र कोकणला वरदान लाभलेल्या पावसाचे जलसंपत्तीत रुपांतर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे येथे पाण्याची कमतरता भासणार नाही, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस डोंगरउतारावरून नद्या, नाले आणि खाड्यांमार्गे थेट समुद्राला मिळतो. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत पुरेशा प्रमाणात मुरत नाही. परिणामी पावसाळ्यानंतर विहिरी, विंधन विहिरी आणि लहान जलस्रोतांच्या पाणीपातळीत घट होण्याची शक्यता निर्माण होते. यंदाच्या पावसातील अनियमिततेने ही समस्या अधिक ठळक केली. त्यामुळे उपलब्ध पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.
संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून सिंधुदुर्ग जिह्यात 10 हजार 500 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नव्हे, तर ग्रामस्थ, शेतकरी, तऊण, महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सक्रिय सहभागामुळे हे शक्य झाले. गावोगावी श्रमदानातून बंधारे उभारण्यात आले. त्यामुळे ही मोहीम केवळ शासकीय कार्यक्रम न राहता व्यापक लोकचळवळ बनली.
रत्नागिरी जिह्यातही 12 हजार 500 कच्चे व वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत सात हजार बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बंधाऱ्यांची उभारणीही सुरू आहे. अशाप्रकारे दोन्ही जिह्यांत एकत्रितपणे जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून कोकणात पाणी अडविण्याची सामूहिक चळवळ आकार घेत आहे. कच्चे आणि वनराई बंधारे हे स्थानिक पातळीवर कमी खर्चात उभारता येणारे प्रभावी उपाय आहेत. नदी-नाल्यांमधील योग्य जागी दगड, माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्य वापरून कच्चे बंधारे बांधले जातात. तर रिकाम्या सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती, वाळू किंवा अन्य साहित्य भरून वनराई बंधारे उभारले जातात. या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा वेग कमी होतो, पाणी काही काळ अडविले जाते आणि भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, स्थानिक साहित्य आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून ही कामे शक्य होत असल्याने ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे.
केवळ बंधारे बांधून थांबण्याऐवजी आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईचे प्रभावी नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यांत कृती आराखडे तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. गावनिहाय पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठा योजनांची स्थिती, विहिरी व अन्य जलस्रोतांची पातळी, संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे आणि भविष्यातील पाण्याची गरज यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर किंवा पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यापेक्षा संभाव्य संकटाचा आधीच अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा या नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना ग्रामपंचायती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची जोड मिळाल्यास ग्रामीण भागातील पाणीप्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळता येऊ शकतो.
कोकणातील भातशेतीबरोबरच आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि कोकम बागायती या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास या पिकांवर परिणाम होतो. अशावेळी बंधाऱ्यांमध्ये अडविलेले पाणी आणि त्यातून होणारे भूजल पुनर्भरण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. पशुधनासाठी पाणी, घरगुती वापर आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन यासाठीही या मोहिमेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. हजारो बंधाऱ्यांची उभारणी हे निश्चितच कौतुकास्पद यश आहे. मात्र, या कामांचे सातत्य टिकविणे आणि त्यातून प्रत्यक्ष किती पाणी उपलब्ध झाले, याचे मूल्यमापन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बंधाऱ्यांची नियमित देखभाल, गाळ काढणे, जुन्या विहिरी व तलावांचे पुनऊज्जीवन, पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था, शेततळी आणि ठिबक सिंचनाला प्रोत्साहन अशा उपाययोजनांची जोड द्यावी लागणार आहे. प्रत्येक गावाने स्वत:चा जलआराखडा तयार करून पाण्याचा वापर आणि उपलब्धतेचा समतोल राखणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिह्याने 10 हजार 500 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून लोकसहभागातून काय साध्य होऊ शकते, याचा आदर्श निर्माण केला आहे. रत्नागिरी जिह्यातही सात हजार बंधाऱ्यांची पूर्तता झाली असून उर्वरित उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडे तयार करण्याचे काम हाती घेतल्याने या मोहिमेला दीर्घकालीन नियोजनाची जोड मिळत आहे. प्रशासनाचे नियोजन, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे श्रमदान या त्रिसूत्रीच्या बळावर कोकणने जलसंधारणाच्या क्षेत्रात आशादायी पाऊल टाकले आहे. ही एकजूट कायम राहिली आणि तात्पुरत्या उपाययोजनांचे रुपांतर कायमस्वरुपी जलसुरक्षा अभियानात झाले, तर भविष्यातील पाणीटंचाईवर निश्चितच प्रभावीपणे मात करता येईल. कारण कोकणाला पावसाचे वरदान लाभले आहे; आता त्या वरदानाचे जलसंपत्तीत रुपांतर करण्याची वेळ आली आहे.
संदीप गावडे
