सकल मति प्रकाशु...
मांगल्य, चैतन्य व आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गणेशोत्सव. बुद्धिदैवत गजाननाच्या या उत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात सुऊवात होत असून, पुढचे दहा दिवस हे समस्त गणेशभक्तांसाठी भारावून टाकणारे असतील. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये सकळांचे आद्यदैवत असलेल्या श्री गणेशाचा उत्सव हा तर परमोच्च बिंदूच म्हणावा लागेल. गणपती ही विद्येची, कलेची देवता म्हणून ओळखली जाते. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ होतो, श्री गणेशाच्या साक्षीने. कोकण, महाराष्ट्रासह इतर भागात घरोघरी गणपती बसविण्याची परंपरा पूर्वापार आहे. तथापि, सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला, तो पुण्यनगरीतून. तो नेमकी कोणत्या वर्षी झाला वगैरेविषयी आपल्याकडे मतमतांतरे पहायला मिळतात. किंबहुना, गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी तसेच घोटावडेकर व खासगीवाले या सर्वांनी अमूल्य योगदान दिल्याचे जाणकार सांगतात. गणेशोत्सवामागची समाजधुरिणांची भूमिका ही अत्यंत स्पष्ट होती. स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाद्वारे समाज एकत्र यावा, संघटित व्हावा, ही अपेक्षा नक्कीच फलद्रूप झाली. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज झालेला विस्तार, त्याला लागलेले वळण बघता लोकमान्यांना हेच अपेक्षित होते का, असा प्रश्न निर्माण होतो. एकेकाळी, पुणे, मुंबई वा काही शहरांपुरता सीमित असलेला गणेशोत्सव आता सर्वदूर पोहोचला आहे. असे असले, तरी या उत्सवात भक्तिभाव किती, एकत्र येण्याची ऊर्मी किती अन् केवळ धांगडधिंगा करण्याचा हेतू किती, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. खरे तर गणरायाचे आगमन हा उत्सवाचा आरंभबिंदू. सानथोर सर्वच गणरायाच्या स्वागतासाठी आसुसलेले असतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र गजाननाचे जल्लोषात स्वागत होणे, हे आघाने आलेच. पुण्यामुंबईतील गणेशोत्सवास स्वागत व विसर्जन मिरवणुकीस आगळीवेगळी परंपरा आहे. छोट्या, मोठ्या बहुतेक मंडळांचा मिरवणुका काढण्याकडे कल असतो. त्याकरिता विविध पथकांना पाचारण करण्यात येते. या पथकांच्या सादरीकरण, कसरतींमुळेच उत्सव नादमय, लयबद्ध होत असतो. मात्र, त्यांची संख्या किती असावी, आवाज किती असावा, याला सध्या कोणतेही बंधन राहिलेले दिसत नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून हा उत्सव अधिकाधिक कर्कश होत असल्याचे दिसून येते. अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक यावर सातत्याने आपली भूमिका मांडत आले आहेत. मात्र, त्याने परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही. पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात व्यक्त केलेली मते ही धाडसी व कालसुसंगत म्हणावी लागतील. वास्तविक, डॉ. कुलकर्णी या भाजपाच्या खासदार. सणउत्सव दणक्यात साजरे करण्याकडे भाजपवाल्यांचा कल दिसतो. अशा या मांदियाळीत डॉ. कुलकर्णी वेगळ्या ठरतात. गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळायला हवी. तसेच श्री गणेशोसमोर बीभत्स गाणी लावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले आहे. त्यातील मर्म समजून घेतले पाहिजे. कुठलेही सण आणि ध्वनिप्रदूषण हे आज समीकरणच बनले आहे. गणेशोत्सवात तर आवाज कुणाचा, यावर जणू स्पर्धा लागलेली असते. परंतु, या अहमहमिकेमुळे ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासह अन्य आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो, ऐकण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यांच्या जीवावर बेतू शकते, याचे भान बाळगताना कुणी दिसत नाही. परंतु, यापुढे तरी मंडळांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान बाळगणे गरजेचे होय. ढोल ताशा ही आपली पारंपरिक वाद्ये आहेत. पथकांची, त्यातील सदस्यांची संख्या मर्यादित ठेवली, तर पारंपरिक वादन नक्कीच सुश्राव्य व सुसह्या होऊ शकते. अलीकडे सर्वत्र लेझर संस्कृतीही फोफावलेली दिसते. लेझरच्या या प्रकाशझोतांमुळे अनेकांना डोळ्याचे त्रास झाल्याची वा अंधत्व आल्याची उदाहरणे सापडतात. बंदी वा तत्सम कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही हे लेझर शो होत असतील, याला निर्ढावलेपणाच म्हणावा लागेल. अशा या सगळ्या कोलाहलात काही गणेश मंडळे निश्चितपणे लोकोपयोगी उपक्रम राबवताना असतात. त्यांचे कार्य सर्वांकरिता अनुकरणीय म्हणता येईल. खरे तर महाराष्ट्रात मंडळांचे मोठे जाळे आहे. मंडळ संस्कृतीनेच अनेक नेतृत्वे उभी केली आहेत. त्यामुळे उत्सवाला विधायक कसे करता येईल, यावर कटाक्ष असायला हवा. विसर्जन मिरवणूक म्हणजे गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र, लांबत जाणाऱ्या विसर्जन मिरवणुका हा एक जटील प्रश्न होऊन बसला आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीचे तास कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न स्तुत्यच म्हणावे लागतील. अलीकडच्या काळात काही मंडळांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहराशहरांतील मंडळांनीही उत्सव अधिकाधिक समाजाभिमुख होण्यासह शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे झाल्यास त्यातून बऱ्याच गोष्टी साध्य होतील. गणेशोत्सव आणि त्याचे अर्थकारण, हाही मोठा विषय आहे. मागच्या काही वर्षांत महागाईने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. असे असले, तरी आपल्या परिस्थितीप्रमाणे सण, उत्सव साजरे करण्याकडे नागरिकांचा कल असतो. उत्सव काळात अनेक जण छोटे, मोठे व्यवसाय करतात. बाजारात चलनवलन वा पैसा खेळत राहणे, ही महत्त्वाची गोष्ट होय. कारण, त्यातूनच अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. त्यादृष्टीने यंदाही बाजारपेठ उत्साही रहावी, हीच अपेक्षा असेल. यंदा राज्यासह देशभर चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी पाहता देशभरात सरासरीच्या 8 टक्के अधिकचा पाऊस नोंदवला गेला आहे. ही गणरायाचीच कृपा म्हणता येईल. असे असले, तरी काही भागावर पसरलेले ओल्या दुष्काळाचे सावट विघ्नहर्त्या गजाननाने दूर करावे, अशी प्रार्थना असेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी ‘देवा तूचि गणेशु। सकल मतिप्रकाशू।’ असे गणरायाचे वर्णन केले आहे. हा देव गणेश सकळांना बुद्धीचा प्रकाश देणार आहे. द्वेष, मत्सर, भेदाभेदाने पछाडलेल्या माणसाला चांगली बुद्धी द्यावी, हेच गणरायाकडे मागणे असेल.