For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोंगरात टाकले लाखावर बीजगोळे

02:09 PM Jul 03, 2025 IST | Radhika Patil
डोंगरात टाकले लाखावर बीजगोळे
Advertisement

तळमावले :

Advertisement

बेकायदा वृक्षतोडीमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि उद्ध्वस्त होणारी वनसंपदा जतन करण्यासाठी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले एक लाख बीजगोळे गावाशेजारच्या डोंगरामध्ये टाकण्यात आले. या उपक्रमात गावातील महिला, पुरुषांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले.

गावामध्ये हजारो वृक्षांची लागवड केली जात असतानाच आता जंगलात आणि वनहद्दीतही वृक्षसंपदा वाढली पाहिजे यासाठी बीजगोळे तयार करण्याबाबत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार गावात असलेल्या महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी बीजसंकलनाची मोहीम हाती घेतली. गाव परिसरात असलेल्या चिंच, जांभूळ, हेळा, साग, पेरू, चीक्कू, शिवरी आदी देशी प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर बीज योग्य पध्दतीने सुकवून सेंद्रिय खत मिश्रीत मातीपासून गोळे तयार करण्यात आले. चार महिने सुकवलेले बीजगोळे गावाशेजारी असलेल्या डोंगरात मंगळवारी सकाळी टाकण्यात आले.यासाठी गावातील महिला बचत गटाच्या महिला, पुरुष, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

Advertisement

  • लाखो वृक्षनिर्मितीचा संकल्प

देशी प्रजातीच्या वृक्षांच्या जाती दिवसेंदिवस नष्ट होऊ लागल्या आहेत. त्याचे संकलन आणि संगोपन झाले पाहिजे. पर्यावरणीयदृष्ट्या गरजेचे असलेले वृक्ष जतन करण्यासाठी मान्याचीवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. दरवर्षी एक लाख बीजगोळ्यांच्या माध्यमातून ही चळवळ कायम ठेवण्याचा निर्धार येथील महिलांनी केला असल्याचे सांगण्यात आले.

  • बीज संकलन केंद्र... ते वृक्षनिर्मिती...

येथील बचत गटाच्या महिलांनी बीजसंकलन केंद्र उभारले असून त्याठिकाणी गाव परिसरात असलेल्या देशी प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे संकलन केले जाते. त्या बिया संकलन करण्यासाठी महिलांमध्ये स्पर्धा ठेवून जास्तीत जास्त बिया संकलित करण्यात येतात. याच बिया वापरुन बीजगोळे तयार करण्यात येत आहेत. या संकलन केंद्राचे नामकरण वसुंधरा बीज संकलन केंद्र असे करण्यात आले आहे.

  • महिलांमुळे उपक्रम यशस्वी

डोंगरांमध्ये हिरवाई आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यामुळे डोंगरांमध्ये जंगली झाडांसह देशी प्रजातीच्या वृक्षांचेही जतन होण्यास मदत होईल. गावातील महिलांमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सरिता पवार आदींचे मार्गदर्शन लाभले. रवींद्र माने, सरपंच

Advertisement
Tags :

.