बी खाता भूखंडधारकांचे वीज मीटरसाठी 800 हून अधिक अर्ज
14 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बी खाता असलेल्या भूखंडांवरील इमारतींना मागील महिनाभरापासून वीज मीटर दिले जात आहेत. वनटाईम सेटलमेंट अंतर्गत राज्य सरकारने ही योजना लागू केली असून बेळगाव शहरातील 800 हून अधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 14 ऑगस्टपर्यंत नागरिकांना अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने वीज मीटर व पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) सक्तीचे केले होते. बेळगाव शहरात अनेक अनधिकृत भूखंडांवर इमारतींचे बांधकाम असल्यामुळे ओसी प्रमाणपत्र मिळत नव्हते. सबरजिस्ट्रार खरेदी असलेल्या भूखंडांना बी खाता प्रमाणपत्र देण्यात आले होते. परंतु त्यांनाही वीज मीटर मिळत नव्हता. इमारतींचे बांधकाम करून मीटरसाठीं प्रतीक्षा करावी लागली.
त्यामुळे राज्य सरकारने वनटाईम सेटलमेंट अंतर्गत जून महिन्याच्या अखेरीला बी खाता सबरजिस्ट्रार खरेदी असलेल्या इमारतींना वीज मीटर देण्यास सुरुवात केली. 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून मीटर मिळत नसल्याने प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी पहिल्या दिवसापासूनच अर्ज दाखल केला होता.
मागील महिनाभरात 800 च्या जवळपास अर्ज शहर हेस्कॉम कार्यालयात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर बेळगाव ग्रामीणमध्येही अर्ज करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. वीज मीटर मिळत असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.