26 हून अधिक काँग्रेस आमदार दिल्ली दौऱ्यावर
आज पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता : मंत्रिमंडळ पुनर्रचनेची करणार मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याकरिता 26 हून अधिक आमदार रविवारी दिल्लीला रवाना झाले. सोमवारी सकाळी ते दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतरांना भेटण्याचा प्रयत्न करतील.
राहुल गांधींच्या उपलब्धतेबद्दल शंका असून मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीसाठी वेळ दिल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांची 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. उर्वरित वर्षांचा कार्यकाळ देण्याची मागणी ज्येष्ठ आमदार करणार आहेत. यापूर्वी ज्येष्ठ आमदारांनी बेंगळूरमधील एका खासगी क्लबमध्ये बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेत मंत्रिमंडळात फेरबदल करून आम्हाला एक संधी देण्याची विनंती केली होती.
हायकमांडने परवानगी दिल्यास ते मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास तयार आहेत, असे आश्वासन सिद्धरामय्या यांनी आमदार शिष्टमंडळाला दिले होते. त्यामुळे, हायकमांडच्या माध्यमातून मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी ज्येष्ठ आमदारांनी पुढाकार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मंत्रिमंडळात फेरबदल नको आहे. त्यामुळे त्यांनी आमदार शिष्टमंडळाशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची संधी मिळाली तर ते आपल्या समर्थकांना खूश करू शकतील. त्यानंतर ते आपले समर्थक वाढवू शकतील, असा त्यांचा हेतू आहे. याशिवाय, मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास नेतृत्व बदलाची मागणीही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपले दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार करण्यासाठी आमदार शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले आहे. अथणीचे लक्ष्मण सवदी, रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण, मुद्देबिहाळचे सी. एस. नाडगौड, धारवाडचे विनय कुलकर्णी, हुबळी-धारवाड पूर्वचे आमदार प्रसाद अब्बय्या, शिरा मतदारसंघाचे आमदार टी. बी. जयचंद्र, चामराजनगरचे आमदार पुट्टरंगशेट्टी, शांतीनगरचे आमदार एन. ए. हॅरिस, बागेपल्लीचे सुब्बारे•ाr, सिंधनूरचे हंपनगौडा बारर्ली, ब्याडगीचे आमदार बसवराज शिवण्णवर, हिरेकेरुरचे आमदार यू. बी. बनकार, रोणचे आमदार जी. एस. पाटील, बंगारपेठचे आमदार एस. एन. नारायणस्वामी, तिपटूरचे आमदार के. षडाक्षरी, आनेकलचे बी. शिवण्णा, मळवळ्ळीचे पी. नरेंद्र स्वामी, कोप्पळचे राघवेंद्र यत्नाळ, गोविंदराज नगरचे प्रियकृष्ण आणि सागर जिल्ह्यातील बेळूरचे गोपालकृष्ण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.