जिल्ह्यात 10 हजारावर शेतकऱ्यांनी काढला पीक विमा
कोल्हापूर :
सरकारची एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर राज्य सरकारने खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिह्यात या योजनेअंतर्गत 3069.01 हेक्टरवर चार हजार 354 शेतक्रयांनी पीक विमा उतरविला आहे. पीक विमा घेण्यासाठी मुदत वाढविण्यात आली असून अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्य सरकारने खरीप 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक वर्षासाठी कोल्हापूर जिह्यासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीक विमा काढण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत ठेवली होती. आता ही मुदत 14 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. उत्पादनावर आधारित योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कोल्हापूर जिह्यात 58 कर्जदार, तर दहा हजार 076 अशा एकूण दहा हजार 134 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
जिल्ह्यात सातत्याने बदलणारे हवामान, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षीपासून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, ई- पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी व शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी व विमा यामध्ये तफावत आढळल्यास विमा रद्द होणार असून हप्ता रक्कमही जप्त होणार आहे. पीक विमा काढण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधिक्षक नामदेव परिट यांनी केले आहे.
- विमा योजनेतील पिके
भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका,तुर, मुग, उडीद, सोयाबीण, भुईमुग, तीळ,कापुस व कांदा या पिकांसाठी शेतकऱ्याना या योजनेत भाग घेता येईल.
- पीक विमा काढलेले शेतकरी आणि क्षेत्र असे
तालुका कर्जदार बिगर कर्जदार एकूण क्षेत्र हेक्टर
आजरा 0 143 38.95
गगनबावडा 0 6 1.01
भुदरगड 7 723 84.99
चंदगड 33 1949 981.8
गडहिग्लज 3 1499 429.98
हातकंणगले 4 872 296.37
कागल 0 865 240.31
करवीर 1 277 60.01
पन्हाळा 6 553 130.12
राधानगरी 0 1541 265.07
शाहुवाडी 4 538 65.6
शिरोळ 0 1110 527.86