सीरिया हिंसाचारात एक हजारांवर बळी
लष्कराचा असद समर्थकांशी संघर्ष
वृत्तसंस्था/ दमास्कस
सीरियातील लताकिया आणि टार्टस येथे गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या सीरियन यादवी युद्धानंतरचा हा मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. सीरियातील युद्धावर लक्ष ठेवणारी ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ या संस्थेने रविवारी ही माहिती दिली आहे.
गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांनी अलावाइट मुस्लीम समुदायातील 745 हून अधिक लोकांना ठार मारले आहे. त्यापैकी बहुतेकांना फाशी देण्यात आली आहे. याशिवाय, असद समर्थक असलेल्या 148 सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. त्याव्यतिरिक्त या हिंसाचारात 125 सुरक्षा कर्मचारीही मृत्युमुखी पडले आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर बशर देश सोडून रशियाला पळून गेला. यानंतर, हयात तहरीर अल-शाम या दहशतवादी संघटनेने सीरियातील सत्ता हाती घेतली आहे.
असदच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर सर्वप्रथम हल्ला केल्यामुळे हिंसाचार भडकल्याचा दावा केला जात आहे. तर असदच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर प्रत्यारोप करताना निवासी भागात बॉम्बस्फोट घडवल्याचे म्हटले आहे. सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून आता त्याचे वणव्यात रुपांतर झाले आहे. सरकारने लताकिया आणि टार्टसमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. तसेच, कर्फ्यू लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लताकिया आणि टार्टस प्रांतातील हिंसाचारामुळे अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये असद यांनी सत्ता गमावल्यापासून देशात झालेल्या हिंसाचारात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत.