गणेशोत्सवातील थकीत वीजबिल पदाधिकाऱ्यांच्या घरगुती मीटरवर वर्ग
हेस्कॉमकडून वीजबिल दिल्याने कार्यकर्ते संतापले
बेळगाव : गणेशोत्सवामध्ये वापरलेल्या विजेचे बिल आता मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या नावे दिले जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरगुती मीटरवर वीजबिल वर्ग करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वकल्पना न देता थेट घरगुती मीटरवर वाढीव वीजबिल देण्यात आले आहे. त्यामुळे किमान एकदा तरी कल्पना देणे गरजेचे होते. गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस वीज वापरली जाते. गणेशोत्सवापूर्वी मीटर घेताना पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकासह घरचा मीटर क्रमांक घेतला जातो. त्यावेळी अॅडव्हान्स देखील भरून घेतले जाते. परंतु, बऱ्याच वेळा अॅडव्हान्सपेक्षा विजेचे बिल अधिक प्रमाणात आल्याने ते बिल एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरच्या मीटरवर वर्ग केले जाते. परंतु, याऐवजी जर त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना थकीत वीजबिलाची माहिती दिल्यास ते वेळेत भरणे शक्य होऊ शकते.
जानेवारी महिन्याचे वीजबिल देण्यास सुरुवात केली आहे. ज्या गणेशोत्सव मंडळाचे वीजबिल थकीत आहे, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरगुती मीटरवर ते जमा केले आहे. एरवी 50 ते 100 रुपये येणारे विजेचे बिल शुक्रवारी अचानक 8 हजार रुपये आल्याने ग्राहकही चक्रावले. इतके विजेचे बिल कसे काय येऊ शकते, असा प्रश्न त्यांनाही पडला. याबाबत मीटररिडरलाही माहिती नसल्याने गोंधळ अधिकच वाढत गेला. हेस्कॉमच्या कार्यालयात या वीजबिलाविषयी चौकशी केली असता मंडळाचे थकीत वीजबिल घरगुती मीटरवर वर्ग करण्यात आल्याने वीजबिल अधिक आल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवानंतर संबंधित मंडळाचे कार्यकर्ते दोन ते तीन वेळा हेस्कॉम कार्यालयात गेले होते. परंतु, तेथे वीजबिल भरण्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते माघारी फिरले. परंतु, अचानक असे बिल देण्यात आल्याने कार्यकर्तेही संतापले आहेत.