कोरटकर कळंबा कारागृहाबाहेर
कोल्हापूर :
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर सुमारे 11 दिवसांनी शुक्रवारी दुपारी कळंबा कारागृहातून बाहेर पडला. तेथून तो पोलीस बंदोबस्तात खासगी चारचाकी गाडीतून कोल्हापूर विमानतळावर गेला. तो विमानाने मुंबईकडे निघून गेला.
प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना मध्यरात्री फोन करुन, ठार मारण्याची धमकी देत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादरम्यान त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करुन, अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता. आठ दिवसानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध सुऊ केला. पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचरियाल येथे 24 मार्च रोजी दुपारी अटक केली. 25 मार्च रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींकडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कारागृहामधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोरटकरने वैयक्तिक जामिनावर सुटका व्हावी याकरीता न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जाच्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादानंतर न्यायालयाने बुधवारी (9 एप्रिल) अटी-शर्तींसह 50 हजार ऊपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. पण कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्याने त्याचा कळंबा कारागृहामधील आणखीन दोन दिवस मुक्काम वाढला होता. जामीन अर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी कोरटकर कारागृहातून बाहेर आला. बाहेर येताच तो पोलीस बंदोबस्तात खासगी चारचाकी गाडीमधून थेट कोल्हापूर विमानतळावर आला. तेथून तो विमानातून मुंबईकडे निघून गेला. मुंबई येथून तो विमानाने नागपूरकडे रवाना झाला. जिल्हा पोलीस दलाकडून शुक्रवारी सकाळपासून कळंबा कारागृहाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्तामुळे कळंबा कारागृहाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.