अनगोळ तलावात युवकाचा बुडून मृत्यू
बदकाची अंडी काढण्यासाठी गेला असता कमळाच्या वेलीत पाय अडकला
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बदकांची अंडी काढण्यासाठी तलावात उतरलेल्या एका युवकाचा कमळाच्या वेलीत पाय अडकून बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी अनगोळ येथील नाथ पै तलावात ही घटना घडली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सतीश शशिकांत कदम (वय 36) राहणार लोहार गल्ली, अनगोळ असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. बी. दामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सतीश हा युवक वॉशिंग मशीन रिपेरीचे काम करीत होता. शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास बदकांची अंडी काढण्यासाठी तो नाथ पै तलावात उतरला. थोड्या वेळात कमळांच्या वेलीत पाय अडकून बुडून त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी एचईआरएफ रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. बसवराज हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतीशचा मृतदेह अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.