For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाचा उद्रेक

06:40 AM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाचा उद्रेक
Advertisement

पाणी शांत वाहते तोवरच ठीक, पण पुराचा वेढा तरुण रक्ताचा असतो’ अशी म्हण प्रचलित आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला की, ते किती अनावर होऊ शकतात, याची प्रचिती सध्या फ्रान्समधील प्रशासनाला येत आहे. गेल्या महिन्यापासून फ्रान्समध्ये माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे त्यांना भेडसावणाऱ्या मुलभूत शैक्षणिक समस्यांवरून आंदोलन सुरु आहे. ते अधिक काळ लांबण्याची शक्यता ध्यानात घेता, सोमवारी पाचशेहून अधिक शाळांतील वर्ग स्थगित करण्याचा आदेश शिक्षण मंत्र्यांना द्यावा लागला.

Advertisement

माध्यमिक शिक्षण देणाऱ्या, शाळा, ज्यांना फ्रान्समध्ये ‘लायसी’ म्हणून संबोधले जाते, त्या शाळांतील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आहे. म्हणजेच पिढ्यांच्या परिभाषेत ज्यांना जेन-अल्फा आणि जेन-झी म्हटले जाते, ते गट या आंदोलनात विशेषत्वाने सक्रिय आहेत. सदर शाळांतून विद्यार्थी, त्यांच्या शिक्षणाची मध्यम स्तरावरील तीन शैक्षणिक वर्षे पूर्ण करतात. 17 सप्टेंबर रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका शाळेत सुरु झालेले हे आंदोलन, हां हां म्हणता देशव्यापी बनले. देशभरात आतापर्यंत एकूण हजारभर ठिकाणी विद्यार्थी निदर्शने झाली. दंगल नियंत्रण करणाऱ्या पोलिसांशी झालेल्या संघर्षात शेकडो जण जखमी झाले. विशेष म्हणजे, फ्रान्ससारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशात, अल्पवयीन मुलांच्या प्रामुख्याने भरणा असलेल्या 6000 जणांना अटक करण्याची नामुष्की गेल्या अनेक दशकांनंतर सरकारवर पहिल्यांदाच आली आहे.

सरकारला अनपेक्षित धक्का देणाऱ्या या आंदोलनातील पोलिसांचा लाठीहल्ला, अश्रूधूर, शाळा प्रवेशद्वारावरील विद्यार्थ्यांची नाकेबंदी, उंचावलेले फलक मजकूर, घोषणाबाजी यांची दृष्ये जगभरात वाऱ्यासारखी पसरल्याने, फ्रान्सच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रूटी अक्षरश: जगाच्या वेशीवर टांगल्या गेल्या. फ्रान्स सरकारने व्यवस्थेतील मुलभूत दोष मान्य न करता, आधुनिक जागतिक रिवाजानुसार, अशांततेचे खापर अतिडाव्या शक्तीवर फोडून हात झटकले आहेत. तथापि, आंदोलक विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची तातडीने दखल घेतली गेली नाही, तर फ्रेंच सरकारचे हात या आंदोलनात पुरते पोळणार आहेत, हे जाळण्यात आलेल्या 24 हून अधिक शाळा, जखमी झालेले 200 विद्यार्थी, 80 शालेय कर्मचारी आणि 400 पोलीस असा घटनाक्रम दर्शवतो.

Advertisement

विद्यार्थी आंदोलनाची कारणे

शाळांमध्ये शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कमतरता, ही आंदोलकांची प्रमुख तक्रार आहे. नवल म्हणजे, खुद्द शिक्षण मंत्रालयालाच असे आढळून आले की, 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षात, सार्वजनिक माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 10 टक्के अध्यापनाचे तास घेतले गेले नाहीत. यापैकी साडेसात टक्क्यांहून अधिक तास, केवळ पर्यायी शिक्षक नसल्याने वाया गेले. संसाधने, शिक्षक आणि पुरेशा आसन व्यवस्थेच्या अभावामुळे शिक्षणात खंड पडला. शाळांच्या वेळापत्रकात अभ्यासाचे तास वाढवले आहेत. झोपेपेक्षा जास्त तास अभ्यास होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. परिणामी, अभ्यासाचे तास वाढवण्याऐवजी शिक्षणासाठी चांगले वातावरण हवे, या आशयाचे फलक आंदोलकांनी झळकावले. उन्हाळ्यात युरोपमध्ये जीवघेण्या उष्णता लाटांची मालिका आली. फ्रान्सस्थित पश्चिम युरोपने आतापर्यंतच्या सर्वात उष्ण उन्हाळ्याचा सामना केला. या उच्च तापमानामुळे फ्रान्समध्ये जवळपास आठ हजार लोक मृत्यूमुखी पडले. अशा वातावरणात खचाखच भरलेले वर्ग आणि असह्या उकाडा, यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्ग खोल्या वाढवण्याची मागणीही लावून धरली आहे. शाळांच्या इमारती जिर्ण झाल्या आहेत, उपहारगृहे अगदी लहान, पर्यवेक्षकांची संख्या कमी, संसाधनांचा अभाव, आर्थिक तरतूदी नाहीत या साऱ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांत धुमसत असलेल्या रागाचे अखेर देशव्यापी आंदोलनात रुपांतर झाले.

शिक्षणमंत्र्यांचे अजब तर्कट

अति डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थी चळवळीत घुसखोरी करून, ती हायजॅक केली आणि टोकाचा हिंसाचार घडवला, असा आरोप करणाऱ्या शिक्षणमंत्री एदुआर्द गेफ्रे यांनी, दुसरीकडे आंदोलकांनी मांडलेल्या विशिष्ट तक्रारी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काही प्रमाणात भिन्न आहेत, या वस्तुस्थितीचा आधार चुकांवर पांघरुण टाकण्यासाठी घेतला. अशांततेच्या मुळाशी असलेल्या कारणांवर उपाययोजना करण्यामध्ये हा एक गुंतागुंतीचा घटक असल्याचे ते म्हणाले. आंदोलनात कोणत्याही राष्ट्रीय मागण्या नाहीत, या सगळ्याची सुरुवात स्थानिक मागण्यांपासून झाली, असा हास्यास्पद युक्तिवादही त्यांनी केला.

‘वेड पांघरुण पेडगांवला जाणाऱ्या’ या शिक्षणमंत्र्यांना, राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक अर्थसंकल्पात भरीव तरतूदी करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली, तर आंदोलनाचे मूळच नष्ट होते, हे ठाऊक नाही, असे कसे म्हणावे? फ्रेंच सरकार लष्करी खर्चात उल्लेखनीय वाढ करत आहे, त्याचवेळी शैक्षणिक खर्चात हात आखडता घेत आहे हा विरोधाभासही या आंदोलनात चव्हाट्यावर आला. सुदैवाने, लोकशाहीत लोकनियुक्त सरकारचे आद्य कर्तव्य लोकांचे भले करणे हेच असते व त्यातील उणिवा दर्शवणे हाच पत्रकारितेचा मुख्य विषय असतो, याचे अचूक भान असणारी फ्रान्समधील वृत्तमाध्यमे, सरकारी कामाची विवेकी नोंद घेऊन, चुकांवर मात्र विशेषत्वाने तुटून पडतात, याचे दर्शनही माध्यमांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मागण्या लावून धरल्या त्यातून झाले.

कर्मचारी संप आणि विद्यार्थी

विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील महत्त्वपूर्ण योगायोग हा की, सरकारच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाविरोधात, सार्वजनिक क्षेत्रातील देशव्यापी संपाच्यावेळीच शाळांमधील आंदोलने सुरु झाली. सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित अर्थसंकल्पातील 54 अब्ज युरो निधी कपातीस विरोध आहे. सरकारने निधी तरतूद वाचवण्यासाठी, येत्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन गोठवण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. कामगार संघटनांच्या मते, ही सलग चौथी वार्षिक वेतनवाढ बंदी असेल. त्यामुळे शिक्षक, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी देखील विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते. शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या मूलत: सारख्याच आहेत. वाढती विद्यार्थी संख्या, सहकाऱ्यांचा अभाव, संसाधनांची कमतरता यामुळे शिक्षकांवर वाढता ताण आहे. यामुळे आंदोलनांचे सत्र लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत. एकंदरीत अपुऱ्या निधीच्या शिक्षण व्यवस्थेबाबत किशोर व युवकांच्या मनातील रोष असो किंवा सार्वत्रिक आर्थिक कोंडीबाबत प्रौढांच्या मनातील असंतोष असो, ही स्थिती सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुंदावलेली असमाधानाची दरी अधोरेखित करते.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.