हेरले परिसरात जनावारांना लाळ खुरकत आजाराचा प्रादुर्भाव
पुलाची शिरोली / वार्ताहर
हेरले ता. हातकणंगले येथील जनावरांना लाळ खुरकत आजाराचा प्रादुर्भाव झाला असून दोन जातीवंत म्हैसी व तीन जातीवंत गाई अशी, पाच दुभती जनावरे व दोन लहान वासरे मयत झाली आहेत. या आजारामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान गोकुळचे संचालक डॉ. सुजीत मिणचेकर यांनी गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांना भेट देवून आजार व उपचाराची माहिती घेतली.
मागील कांही महिन्यात लंम्पी आजाराने सर्वत्र थैमान घातले होते. यावेळी शेकडो दुभती जनावरे मयत होवून शेतकरी व पशुधन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
गेली आठ दिवसांपासून हवामानातीत बदल, वाढलेली थंडी यामुळे जनावरांना लाळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गेल्या चार दिवसात हेरले गावातील लाखो रुपये किंमतीची चार जनावरे मयत झाली आहेत. यामध्ये जावेद बाबासो खतीब यांची;१ गाय १ पाडी ,
इस्माईल बाबासो खतिब १ गाय १ पाडी ,अमोल राजकुमार मानगावे १ म्हैस , रत्नेश नेमगोंडा पाटील १ म्हैस ,शरद शिवाप्पा सुर्यवंशी १ गाय. तर अशोक पाटील यांच्या २ गाईंवर उपचार सुरू आहेत.
एकूणच लाळ खुरकत आजाराने हेरले गावात शिरकाव केला असुन शासकीय पशुवैद्यकीय विभाग व दूध संघांच्या पशुवैद्यकीय विभागाने दखल घेवून जनावरांना वेळेत उपचार व जनजागृती करणे आवश्यक आहे.