For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदलापूरमध्ये पालकांच्या संतापाचा उद्रेक

06:09 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बदलापूरमध्ये पालकांच्या संतापाचा उद्रेक
Advertisement

चिमुकलांवर अत्याचार प्रकरण    शाळेत आंदोलन, तोडफोड : चौकशीसाठी एसआयटीची स्थापना  

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

बदलापूर येथील शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच कर्मचाऱ्याने दोन चिमुकलींवर अत्याचार केला. यापैकी एक मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याचे समोर येताच तिच्या पालकांनी तिला डॉक्टरकडे नेत वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याबाबतची माहिती दिली. यानंतर हादरून गेलेल्या पालकांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात विलंब झाला. दरम्यान त्यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याची मदत घेऊन तक्रार दाखल केली.

Advertisement

रेल्वे स्थानकात आंदोलकांनी ‘फाशी फाशी’ अशा मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या  कोणताही निवाडा न करता सर्वांसमोर फाशी अशी मागणी करण्यात येत होती. तसेच झालेला हा भयंकर प्रकार उद्वेग आणणारा असून तरी देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास का लावले ? कायद्याचे राज्य म्हणायचे आणि तक्रार दाखल करून घ्यायचे नाही अशी विचारणा होत होती.

शाळा प्रशासनाकडून देखील टाळाटाळ

ही शाळा नामांकित असल्याने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप होत असून यापूर्वी अशा घटना घडल्याच्याबाबीला पालकांकडून दुजोरा मिळत होता. आंदोलकांनी आंदोलन करून देखील तीन तासांहून अधिक काळ  शाळा प्रशासनाकडून यावर टाळाटाळ केली जात होती. मात्र काही कालावधीनंतर शाळेचे अध्यक्ष जय कोतवाल यांनी समोर येत पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात येत असून तपासकामात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले.

वाहतुकीवर परिणाम

बदलापूरमधील सकाळी आठ वाजल्यापासून सुऊ असलेल्या आंदोलनाचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला. बदलापूर ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे. अंबरनाथ ते खोपोली दरम्यानच्या 30 लोकल रद्द केल्या. सीएसमटी ते अंबरनाथ दरम्यान लोकल सेवा सुरळीत होती. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवऊन वळवली. तर 11 लोकल गाड्या वळविण्यात आल्या. तसेच 10 मेल एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरून वळविण्यात आल्या.

जमाव हटविण्यासाठी लाठीचार्ज :

बदलापूर रेल्वेस्थानकाच्या ट्रॅकवर आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत होते. सहा तासाहून अधिक काळ लोटला तरी देखील आंदोलनकर्ते हटत नसल्याने पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता कारवाईला सुऊवात केली. यावेळी बदलापूर स्थानक आणि रेल्वेट्रॅक खाली करण्याचे आदेश देत आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना रेल्वे स्थानक तसेच ट्रॅकवरून हुसकावून लावले व रेल्वे ट्रॅक खुला केला.

कारवाईस विलंब करणाऱ्यांचे निलंबन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

बदलापूर येथील आंदोलन सुऊ असताना यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते. या गंभीर घटनेची दखल घेत फडणवीस यांनी त्वरीत आदेश दिले. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

आरोपीवर कडक कारवाई होणार : एकनाथ शिंदे

बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पोलिस आयुक्तांच्या सकाळपासून संपर्कात तसेच शिक्षण मंत्र्यांना देखील सुचना देण्यात आल्या आहेत. कायदेशीर कारवाई सुऊ आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. या घटनेतील कारवाई करण्यात विलंब करणाऱ्या पोलिसांना निलंबित केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.  संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. थसेच सरकार संवेदनशील आहे. विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा असावी यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी :

मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले. महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनाला योग्य दिशा आणि मागण्यांचा विचार करत आंदोलकांतील शिष्टमंडळाला पुढे येण्यास आवाहन केले. मात्र हे आंदोलन उत्स्फुर्त असल्याने महाजन यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

गुन्हा दाखल करण्यास 12 तासाहून अधिक वेळ का? : राज ठाकरे

चिमुरडी अत्याचार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास 12 तास का लागले? असा सवाल उपस्थित केला. या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, ‘बदलापूरच्या शाळेत लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले?’ असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून  उपस्थित केला आहे.

ती शाळा भाजपशी संबंधित लोकांची : उध्दव ठाकरे

ज्या शाळेत ही संतापजनक घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधित लोकांची आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘मातोश्री’येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, की एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या -छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात लवकरात लवकर खटला चालवावा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 विरोधकांना केवळ राजकारणातच रस : फडणवीस यांचा आरोप

बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेतील संचालक भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप उध्दव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देताना  विरोधीपक्ष यात राजकीय पोळी भाजत आहेत. यांच्या भावना बोथट आहेत. त्यांच्या मनात निव्वळ राजकारण असल्याचे आता समोर येत असल्याचे म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.

Advertisement
Tags :

.