येळ्ळूर शिवारात मसूरवर फंगस रोगाचा प्रादुर्भाव
वार्ताहर/येळळूर
कडधान्य पिकांवर फंगस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून, कोवळे कडधान्य पीक वाळून जमीनदोस्त होत आहे. प्रामुख्याने मसूर या पिकाला याचा फटका बसला आहे. उगवल्यापासूनच मसूर वाळत असेल तर शेतकऱ्यांच्या पदरात किती उत्पन्न पडणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. प्रत्येक वर्षी येळ्ळूर शिवारात या पिकावर फंगस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात म्हणावे तसे उत्पन्न पडत नाही. मागील वर्षीही या पिकाला याच रोगाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात पंचवीस ते तीस टक्केच उत्पन्न पडले होते. त्यामुळे या वर्षी पेरणी करताना शेतकऱ्र्ंयाना महागाने बियाणे विकत घेऊन पेरणी करावी लागली आहे. पण कोवळ्या पिकांवरच झालेल्या रोगाच्या हल्ल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम
मसूर, वाटणा, हरभरा यासारखी कडधान्य पिके ही नाजूक पिके असून, बदलत्या हवामानाचा तात्काळ यावर परिणाम होतो. मागील कांही दिवसात असणारे ढगाळ वातावरण आणि कमी झालेली थंडी याचा परिणामही या पिकांवर झाला असून, ही पिके प्रामुख्याने जमिनीतील ओलव्याबरोबर पडणाऱ्या दवांवरही चांगली फोफावतात. शिवाय मावळत्या दिशेकडून (मावळता वारा) सुटणारा वाराही पिकाला पोषक असतो.सध्या असे वातावरण नसल्याने याचाही परिणाम या पिकांवर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पेरणीअगोदर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन हवे
येळ्ळूर शिवारातील मसुरला वाढती मागणी बघता हे पीक रोगमुक्त होण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात, कोणत्यावेळी कोणत्या औषधाची फवारणी करावी बियाणांना बुरशीनाशक औषधे लावून बीज प्रक्रिया कशी करावी यासाठी पेरणी आधी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाल्यास शेतकऱ्यांना याचा थोडा फार फायदा होईल. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मातीपरीक्षण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत करणे गरजेचे असून, यासाठी शेतकरी मेळावे भरवून शेतकऱ्यांचे प्रबोदन करणे गरजेचे असल्याचे नवोदित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारने शेतकऱ्यांकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे
दिवसेंदिवस येळ्ळूर मसुरला वाढत चाललेली मागणी बघता यावर अधिक संशोधन होऊन अधिक उत्पन्न देणारे व रोगाला प्रतिकार करणारे वाण विकसित केल्यास पूर्वीप्रमाणे अधिक प्रमाणात शेतकरी या पिकांकडे ओढला जाईल. पूर्वी एकरी दीड ते दोन क्विंटल उत्पन्न देणारे पीक आज क्विटलच्या आतच आहे. यावरही संशोधन होऊन शेतकऱ्याला कडधान्याचे अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल याकडेही लक्ष दिल्यास न परवडनारी शेती ही परडेल. मात्र याकडे कृषी अधिकारी, शेतकरी आणि सरकारने गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.