असंतोषाचा भडका अन् दिल्लीला धडाका
भाजप नेत्यांमधील वाद नव्या वळणावर : बेळगावातील वक्फ बोर्ड विरोधात जनजागृती-आंदोलनानंतर बंडखोर दिल्लीला रवाना
बेळगाव : भाजपमधील पक्षांतर्गत असंतोषाचा भडका उडाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध उघडपणे दंड थोपटलेले माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ हे रविवारी बेळगावात होते. सायंकाळी हायकमांडच्या भेटीसाठी हुबळीहून ते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे सोमवारी राजकीय हालचाली वाढणार आहेत. बी. वाय. विजयेंद्र यांनी नवी दिल्ली येथे पक्षाध्यक्षांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन कर्नाटकातील पक्षांतर्गत घडामोडींची माहिती देऊन बेंगळूरला परतल्यानंतर बसनगौडा पाटील-यत्नाळ व माजी मंत्री अरविंद लिंबावळी आदी नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, कुमार बंगारप्पा, माजी खासदार प्रताप सिंह आदीही सोमवारी दिल्लीला जाणार आहेत.
भाजपमधील संघर्ष नियंत्रणात येण्यापलीकडे गेल्याचे रविवारी दिसून आले. वक्फ बोर्ड विरोधातील आंदोलनासाठी बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी व त्यांचे इतर सहकारी बेळगावात होते. या नेत्यांनी गुप्त बैठकही केली असून दिल्लीत हायकमांडसमोर कोणते मुद्दे मांडायचे? याविषयी चर्चा करण्यात आली आहे. माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी तर आपल्याच पक्षाचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वक्फ बोर्ड विरोधातील आंदोलनाचा एक टप्पा रविवारी बेळगावात पूर्ण झाला आहे. सोमवारी आम्ही सर्वजण नवी दिल्ली येथे पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात येणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
वक्फ बोर्डची समस्या दूर होईपर्यंत आंदोलन छेडण्यात येणार
वक्फ बोर्डसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त समितीतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटकातील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. वक्फ बोर्डची समस्या दूर होईपर्यंत आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे सांगतानाच अरविंद लिंबावळी यांनी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे समर्थन केले. कोणत्या कारणासाठी पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे? आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. वक्फ बोर्डच्या विरोधात आंदोलन करणे चुकीचे आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
बसनगौडांचे उघड आव्हान
बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध आंदोलन तीव्र केले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारीवरून बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावर पक्षाचे हायकमांड कारवाई करणार, अशी चर्चा सुरू असतानाच या चर्चेला बसनगौडा यांनी सडेतोड उत्तर देत हवे तर माझ्यावर कारवाई करा, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे हा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. बेळगाव अधिवेशनानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत बदल होणार, याचे संकेत दिसून येत आहेत. रविवारी ज्या विमानातून बसनगौडा दिल्लीला गेले, त्याच विमानातून खासदार जगदीश शेट्टर, गोविंद कार्जोळ, विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनीही दिल्लीला प्रयाण केले आहे.