For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहरात डेंग्यूचा फैलाव : मुलांना मोठ्या प्रमाणात लागण

10:46 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहरात डेंग्यूचा फैलाव   मुलांना मोठ्या प्रमाणात लागण
Advertisement

नगरपंचायत-आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : वेळीच उपाययोजना आवश्यक

Advertisement

खानापूर : शहरात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले असून याकडे खानापूर आरोग्य विभागाचे तसेच नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून डेंग्यूची साथ वाढण्याचा धोका निर्माण झाला असून वेळीच याच्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायत आणि आरोग्य विभागाने क्रम घेणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात शहरात डेंग्यू रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून अनेक गल्ल्यांतून या रोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच्यात दहा वर्षापासून 15 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना मोठ्याप्रमाणात लागण झाली आहे. शहरात मोठ्याप्रमाणात डासांचा उपद्रव वाढला असून याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले असून डासांच्या निर्मूलनासाठी गेल्या काही महिन्यापासून कोणतीही उपाययोजना केली नाही. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक साथींच्या आजाराची लागण होत आहे. मुळातच यावर्षी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुटका मिळणे कठीण झाले असताना पाण्याच्या प्रादुर्भावामुळे रोगांची लागण होत आहे. शहराचा पाणीपुरवठाही बेभरवशाचा झाला असून शहरातील मुख्य गल्ल्या सोडल्या तर नगरपंचायतीचे साफसफाईकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. नगरपंचायतीने डासांच्या निर्मूलनासाठी क्रम घेणे गरजेचे होते. मात्र नगरपंचायतीचा कारभारच बेभरवशाचा झाला असून फक्त करवसूल करणे हेच काम नगरपंचायतीकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे रोगाची लागण दिसून येत आहे.

डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज : आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर 

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर यांना विचारले असता, शहरासाठी आरोग्य तपासणी अधिकारी नसल्याने नगरपंचायतीच्या आरोग्य विभागानेच याबाबत आम्हाला अहवाल देणे गरजेचे असते. डेंग्यूच्या साथीच्या रोगाचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आल्यावर आम्ही आमच्या नर्सिंग स्टाफकडून सर्वेक्षण केलेले आहे. डेंग्यूच्या रुग्णानी खासगी उपचार न घेता सरकारी दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असेही ते म्हणाले. डेंग्यूच्या रोगावर सरकारी दवाखान्यात योग्य उपचार करून डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. डेंग्यू रोगाबाबत आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच घरातील वापरणारे पाणी वेळोवेळी बदलत राहणे, हीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.