मध्य-पूर्वेत हल्ल्यांचा भडका
अमेरिका-इस्रायलकडून इराणच्या अनेक शहरांवर हल्ला : लष्करी कमांडरचा मृत्यू झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ तेहरान, वॉशिंग्टन
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य-पूर्व भाग पुन्हा एकदा भडकला आहे. इराणची राजधानी तेहरानमधील खमेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी जगासमोर आपली उग्र बाजू दाखवण्यास सुरुवात केली आहे. इराणने सात देशांवर एकाचवेळी प्रतिहल्ले करून रोख-ठोक प्रत्युत्तर दिल्याने भडका वाढला आहे. हल्ल्यानंतर खमेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराण आणि अमेरिकेतील वाढत्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण प्रदेशात उमटत आहेत.
पश्चिम आशियातील तणावाच्या दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणविरुद्ध संयुक्त हल्ला सुरू केला आहे. इस्रायलने एकाचवेळी अनेक इराणी शहरांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणने पाच देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने शनिवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने प्रत्युत्तर म्हणून सुमारे 400 क्षेपणास्त्रs डागली आहेत. इस्रायल व्यतिरिक्त इराणने कुवैत, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियामधील अमेरिकन तळांवरही हल्ला केला आहे. इराणने युएईचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर दुबईलाही लक्ष्य केले आहे. इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, सर्वोच्च नेते खमेनी यांचे कार्यालय आणि इराणच्या अणुऊर्जा संघटनेला लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणी सैन्यदलाचा एक बडा कमांडर ठार झाल्याचा दावा केला जात आहे.
इराणने इस्रायल, सौदी अरेबिया, युएई, कतार, कुवेत आणि बहरीन यांना लक्ष्य केले आहे. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’ने याबाबत दुजोरा देताना बहरीनमधील अमेरिकन हवाई तळावर हल्ल्याचा इशारा देऊन हवाई हल्ल्याचे सायरन सक्रिय केले आहेत. अरबी माध्यमांच्या वृत्तानुसार, बहरीनची राजधानी मनामा येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि धुराचे लोट दिसून आले. इराणने बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या नेव्हल सपोर्ट अॅक्टिव्हिटी (एनएसए) येथील पाचव्या फ्लीट मुख्यालयावर हल्ला केला आहे. इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला असून त्यामध्ये क्षेपणास्त्र अमेरिकन नौदलाच्या मुख्यालयावर आदळताना स्पष्टपणे दिसत आहे.
इराणचा सात ठिकाणांवर प्रतिहल्ला
इराणने सात देशांना लक्ष्य केले आहे. त्यात इस्रायल, कतार, बहरीन, कुवैत, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि अबू धाबी यांचा समावेश आहे. या हल्ल्यांचे व्हिडिओ चित्रिकरण काही लोकांनी केले असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. हल्ल्यांचे व्हिडिओ भयानक असून त्यात आग आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती
इराणच्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर इस्रायलने देशात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. नागरिकांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनात नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत शैक्षणिक संस्था, सार्वजनिक मेळावे आणि अनावश्यक कार्यालये तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तेल अवीवमध्ये स्फोटांमुळे सुरक्षा सतर्कता वाढवली
इस्रायली शहर तेल अवीवमध्ये स्फोटांची नोंद झाली आहे. स्थानिक वृत्तांनुसार, स्फोटांनंतर सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. तथापि, नुकसान किंवा जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पश्चिम आशियात सुरू असलेल्या लष्करी संघर्षादरम्यान राजधानी क्षेत्रात सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
...अन् इस्रायलमध्ये वाजले सायरन
इस्रायली सैन्याच्या मते, इराणने डागलेल्या नवीन क्षेपणास्त्रांचा अचूक मागोवा घेतल्यानंतर देशातील अनेक भागात सायरन वाजले. हवाई दल क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी आणि धोका दूर करण्यासाठी सज्ज असल्याचे लष्कराने सांगितले. सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अभेद्य असली तरीही नागरिकांना होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इराणमधील शाळेवर हल्ला, 40 विद्यार्थिनींचा मृत्यू
इराणी शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण इराणमधील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब शहरातील प्राथमिक मुलींच्या शाळेवर हल्ला झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यात शाळेची इमारत उद्ध्वस्त झाल्यामुळे जवळपास 40 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते, परंतु नंतर मृतांची संख्या झपाट्याने वाढली. या घटनेनंतर परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या दाव्यावर इस्रायलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
तुम्ही युद्ध सुरू केले, पण... : इराण
इस्रायली हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या इराणने नेतान्याहू आणि ट्रम्प यांना उघड धमकी दिली आहे. आम्हीही आता मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला आहे. ‘तुम्ही युद्ध सुरू केले, पण आम्ही ते संपवू.’ असे इराणच्या सरकारी प्रवक्त्याने इस्रायलला आव्हान देत म्हटले आहे. हे विधान दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर अधिक प्रकाश टाकते. मध्यपूर्वेत सुरू झालेले युद्ध आता अधिक तीव्र युद्धाकडे वाटचाल करत आहे. इस्रायलने वारंवार केलेल्या हल्ल्यांनंतर इराणनेही आपली तयारी अधिक सुसज्ज केली आहे.
इराणच्या टार्गेटवरील अमेरिकन लष्करी तळ
कतारमधील अल-उदेद हवाई तळ
कुवैतमधील अल-सलेम हवाई तळ
युएईमधील अल-धफ्रा हवाई तळ
बहरीनमधील नौदलाचे मुख्यालय
इराणने क्षेपणास्त्र हल्ला केलेले देश
इस्रायल
कुवैत
बहरीन
कतार
सौदी अरेबिया
युएई
जॉर्डन
इस्रायलच्या टार्गेटवरील इराणमधील ठिकाणे
गुप्तचर मंत्रालय
संरक्षण मंत्रालय
खमेनींचे कार्यालय
अणुऊर्जा संघटना
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
अमेरिका इराणला कधीही अण्वस्त्रs मिळवू देणार नाही. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रs विकसित केली जात आहेत. ही क्षेपणास्त्रे अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी गंभीर धोका असल्यामुळे ती आम्ही उद्ध्वस्त करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणा दिला आहे.