मणिपूरमधील भडका
मणिपूर या ईशान्य भारतातील राज्यात तीन दिवसांपूर्वी सुरक्षा सैनिकांनी 11 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यापासून तेथे अशांततेने डोके वर काढले आहे. तसे पाहिल्यास हे राज्य त्याच्या स्थापनेपासूनच अशांत आहे. त्यामुळे हिंसाचार आणि फुटीरतावाद हा या राज्याला नवा नाही. तथापि, अलीकडच्या काळात ही अशांतता अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. या अशांततेची कारणे समजून घेण्यासाठी तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मणिपूर प्रदेशाला जवळपास गेल्या 2 हजार वर्षांचा इतिहास आहे. जुन्या काळातही हा प्रदेश कधी एकसंध आणि एकछत्री प्रशासनाच्या अंतर्गत नव्हता. या प्रदेशात अनेक जनजाती आणि जमाती असून त्यांच्यातील संघर्षही या प्रदेशाच्या इतिहासाइतकाच जुना आहे. साधारणत: 1891 मध्ये येथील स्वतंत्र राजांशी युद्ध करुन ब्रिटीशांनी हा प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. त्यानंतर अनेकदा येथील विविध जनजातींनी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सशस्त्र संघर्ष केलेला आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा मणिपूर भारताचा भाग नव्हते. 1949 मध्ये मणिपूरचा भारतात विलय झाला. पण हा विलयही शांततापूर्ण मार्गाने झाला नाही. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. अनेक जनजातींना भारताचा भाग होऊन राहणे अमान्य होते. त्यामुळे या प्रदेशाचा भारतात विलय झाल्यापासून आजवर येथे अनेकदा फुटीरतावादाने डोके वर काढले आहे. 23 ऑक्टोबर 1969 या दिवशी या प्रदेशाला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला. तो मिळण्याच्या कालखंडातही येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाच होता. तीच परंपरा आजही असून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येथील प्रमुख जाती आणि जनजाती एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकतात. या संघर्षाला केवळ जातींच्या स्वतंत्र परिचयाचा संदर्भ आहे, असे नाही. काही प्रमाणात धर्माधर्मातील संघर्षाची पार्श्वभूमीही येथील परिस्थितीला असल्याचे दिसून येते. मणिपूरमधील समाजघटकांची भौगोलिक विभागणीही या संघर्षाचे एक मोठे कारण आहे. गेल्या काही दशकांमधील परिस्थिती पाहता या राज्याचे अंतर्गत मणिपूर आणि बाह्या मणिपूर असे दोन भाग पडतात. बाह्या मणिपूर हा डोंगराळ प्रदेश असून मणिपूरचे खोरे अंतर्गत भागात येते. येथे मैतेयी आणि कुकी या दोन प्रमुख जमाती आहेत. कुकी जमातीचे संख्याबाहुल्य डोंगराळ भागात आहे. तर मैतेयी समाज हा सर्व बाजूंनी वेढलेल्या खोऱ्याच्या प्रदेशात वास्तव्य करतो. कुकी जनसमूह प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीय तर मैतेयी हा समाज प्रामुख्याने हिंदू आहे. मैतेयींची संख्या अन्य कोणत्याही समाजघटकापेक्षा अधिक असली तरी त्यांना वास्तव्याचा प्रदेश अतिशय कमी क्षेत्रफळाचा आहे. तर कुकी समुदायाच्या वास्तव्याचा प्रदेश त्या तुलनेत खूप मोठा आहे. या दोन प्रमुख जमातींसह येथे नागा आणि झुमी अशा आणखी दोन जमातीही आहेत. त्यांची लोकसंख्या तुलनेत बरीच कमी आहे. या सर्व चार जमातींच्या प्रत्येकी अनेक संघटना असून प्रत्येक जमातीत सशस्त्र संघटना आणि गटही आहेत. कुकी हे मूळचे ख्रिश्चन नसून ते वनवासी आहेत. तथापि, ब्रिटीशांच्या राजवटीत या जमातीचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. त्यामुळे आता या जमातीची बहुतेक लोकसंख्या ख्रिश्चन आहे. मैतेयी समाज हा प्रारंभापासून हिंदू आहे. तथापि, कुकींमध्येही काही हिंदू आहेत, तर मैतेयींमध्येही काही ख्रिश्चन आहेत. नागा आणि झुमी यांची स्थितीही काहीशी अशीच आहे. प्रत्येक जमातीचा आणि तिच्यातील उपजमातींचा स्वत:चा स्वतंत्र परिचय असून सांस्कृतिक विभिन्नताही मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासकाळापासून चालत आलेली ही स्थिती लक्षात घेतली तर हे राज्य सातत्याने अशांत का असते, हे समजून येते. या राज्याची एकंदर लोकसंख्या साधारण 37 लाख आहे. या लोकसंख्येत 20 लाखांच्या आसपास मैतेयी समाज आहे. अनाल, मोनसांग, मोयोन आणि मारींग या चार जमाती पूर्वी कुकी म्हणवून घेत होत्या. तथापि, नंतर त्यांनी स्वत:ला नागा म्हणून घेण्यास प्रारंभ केला. या राज्यातील अशांततेला असे अनेक कंगोरे आणि पदर आहेत. फुटीरतावाद आणि दहशतवादासाठी ही परिस्थिती अतिशय अनुकूल असल्याने येथे अनेक फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटना असून त्यांचा एकाचवेळी एकमेकींमध्ये आणि केंद्रीय किंवा राज्यस्तरीय प्रशासनाशी संघर्ष होत असतो. अनेकदा संघर्षविरामही होतो पण ती पुढच्या संघर्षापूर्वीची शांतता असते. अशा अंतर्गत वातावरणातील फुटीरता आणि दहशतवाद अधिक भडकविण्यासाठी विदेशी हातही पुढे आलेले आहेत. चीन आणि शेजारीच असणाऱ्या म्यानमार या देशांमधून येथील बंडखोरीला खतपाणी घातले जाते आणि बेकायदा शस्त्रपुरवठाही विपुल प्रमाणात केला जातो. सध्या या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यापूर्वी काँग्रेसचे सरकार होते. वनवासी जमातींच्या पक्षांनाही त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात जागाही मिळतात. खरे तर येथील समाज शांतताप्रिय आहे, असे तज्ञांचे मत आहे. तथापि, राजकारण, विदेशांमधून होणारा हस्तक्षेप आणि मिळणारे धनसाहाय्य, बेकायदा उद्योग, अंमली पदार्थांचा व्यापार आदी मुद्देही या अशांततेला कारणीभूत आहेत. या बेकायदेशीर उद्योगांचा फटका प्रामुख्याने हिंदू समाजालाच बसतो, असे दिसून येते. दहशतवादी संघटनांकडून हिंदू मंदिरे, हिंदूंच्या शिक्षणसंस्था, हिंदू व्यापारी आणि त्यांची व्यापारी आस्थापने यांना लक्ष्य बनविले जाते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा केली जाते. तीन दिवसांपूर्वी दहशतवादी आणि सुरक्षा सैनिक यांच्यात जी चकमक झाली, ती याच बेकायदेशीर कृत्यांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे, असे मानले जाते. एकंदरीत पाहता, या राज्यात कोणाचेही सरकार असले तरी फुटीरतावाद आणि दहतशवाद संपत नाही. राजकीय पक्ष या परिस्थितीचे खापर एकमेकांवर फोडतात. पण स्थिती त्यांच्याही हातात कित्येकदा नसते. हळूहळू समाजप्रबोधनाच्या माध्यमातून आणि गुन्हेगारी, दहशतवाद आणि फुटीरतावाद यांच्या विरोधात कठोर धोरण स्वीकारुनच येथे शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप केल्यास परिस्थिती अधिकच चिघळण्याशिवाय काहीही घडणार नाही, हे येथील वास्तव आहे, याची जाणीव सर्वांना असणे आवश्यक आहे.