For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौ ते अंतराळ पर्यंतचा प्रवास

06:22 AM Jun 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
लखनौ ते अंतराळ पर्यंतचा प्रवास
Advertisement

आयएसएसवर पोहोचणार शुभांशु शुक्ला

Advertisement

गगनयान मोहिमेला मदत

अॅक्सिओम 4 मिशनद्वारे भारताने अंतराळात दुसऱ्यांदा मानवी पाऊल ठेवण्याची कामगिरी केली आहे. 1984 मध्ये सोव्हियत महासंघाच्या अंतराळयानाद्वारे राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळप्रवासानंतर भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोहीम ठरली आहे. भारताच्या अंतराळ आकांक्षाकरता अॅक्सिओम मोहीम महत्त्वपूर्ण असण्यासोबत गगनयान या महत्त्वाकांक्षी अंतराळमोहिमेकरता ती अत्यंत पथदर्शी ठरणार आहे. भारताची अंतराळमोहीम गगनयान 2027 मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार असून याच्या माध्यमातून भारत रशिया, अमेरिका आणि चीन या निवडक देशांच्या पंक्तीत सामील होण्याचा मान मिळविणार आहे.

Advertisement

भारताने आतापर्यंत अनेक मोहिमांद्वारे स्वत:ची अंतराळक्षमता जगाला दाखवून दिली आहे. यात यशस्वी मंगळमोहीम, चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सर्वप्रथम उतरलेल्या चांद्रयानाद्वारे भारताने स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे.

39 वर्षीय ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुदलात टेस्ट पायलट म्हणून कार्यरत असून त्यांची निवड अंतराळवीर म्हणून करण्यात आली आहे. अॅक्सिओम मोहिमेत त्यांचा सहभाग आहे. इम्कम्पासिंग मायक्रोग्रॅव्हिटी

अॅडाप्शन, स्पेसफ्लाइट

ऑपरेशन्स, प्रक्षेपण प्रक्रिया आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण इत्यादीतील शुक्ला यांचा सहभाग भारताच्या गगनयान या अंतराळमोहिमेकरता आवश्यक प्रावीण्य मिळवून देणार आहे.

गगनयानसाठीमोहिमात्मक अनुभव

वैज्ञानिक प्रयोगांच्या व्यतिरिक्त अॅक्सिओम मोहिमेमुळे महत्त्वपूर्ण मोहिमात्मक अनुभव, प्रक्षेपणपूर्व क्वारेंटाइन, आंतरराष्ट्रीय भागीदारी, प्रवेश अन् निर्गमन प्रक्रिया, वैद्यकीय निदान आणि आरोग्य तयारीविषयक प्रोटोकॉल इत्यादींची माहिती मिळणार आहे. या प्रत्यक्ष अनुभवामुळे इस्रोला अंतराळवीर आणि मानवयुक्त अंतराळमोहिमेसाठी अन्य तंत्रज्ञांना तयार करण्यास मदत होणार आहे.

अॅक्सिओम मोहिमेचे महत्त्व

गगनयान मोहिमेसाठी शुक्ला हे 4 अंतराळवीरांच्या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. अॅक्सिओम मोहिमेतील त्यांच्या सहभागामुळे अंतराळातील कार्याचा अन् वास्तव्याचा अनुभव भारताला उपलब्ध होणार आहे. तसेच या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला बळकटी अन् अंतराळातील मानवी उपस्थिती नोंदविण्याच्या महत्त्वाकांक्षेला चालना मिळणार आहे. तर शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील प्रयोगांमुळे गगनयान मोहिमेला थेट मदत होणार आहे. तसेच यामुळे भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेपूर्वी वैज्ञानिक, वैद्यकीय, मोहिमात्मक आव्हानांवर वेळीच मात करणे शक्य होणार आहे.

शुक्ला यांच्या प्रयोगांमुळे मिळणारे लाभ

सुक्ष्म गुरुत्वाकर्षण स्थितीतील शेती :

शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावरील वास्तव्यात इंडियन सुपरफूड्स म्हणजे मुग आणि मेथी यांचे पीक सुक्ष्म गुरुत्वाकर्षणात घेण्यासंबंधी अध्ययन करणार आहेत. याच्या माध्यमातून शून्य गुरुत्वाकर्षणाचा बियाणे उगविण्यावर आणि रोपवाढीवर कसा परिणाम होतो हे पाहिले जाणार आहे. भारत-आधारित अंतराळ फूड सिस्टीम्स आणि अंतराळात उगविता येणाऱ्या पिकांची ओळख पटविली जाणार आहे. यामुळे चंद्र किंवा मंगळासाठीच्या दीर्घ मोहिमांकरता टिकणारे अन्न निर्माण करण्यास मदत होणार आहे.

स्नायूंची झीज अन् मानवी शरीरशास्त्र :

अॅक्सिओम मोहिमेदरम्यान स्नायूंचा ऱ्हास आणि मानवी पेशींचे वृद्धत्वावर नजर ठेवली जाणार आहे. तसेच सुक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंतराळवीरांच्या मानवी शरीरात कशाप्रकारचे बदल होतात, हे पाहिले जाणार आहे. यातून मिळणारे ज्ञान गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

मानसिक आरोग्य, आकलनस्थिती :

स्पेसफ्लाइट दरम्यान अंतराळवीरांचे मानसिक आरोग्य आणि आकलन कामगिरी पडताळली जाणार आहे. यातून मानवी शरीराकरता चांगला सपोर्ट आणि अंतराळवीरांसाठी उत्तम कार्यवातावरण डिझाइन करण्यास मदत होणार आहे.

सुक्ष्मजीवांचे वर्तन अन् लाइफ सपोर्ट :

अंतराळातील वास्तव्यादरम्यान सुक्ष्मजीवांवर अध्ययन केले जाणार आहे. तसेच एकपेशीय वनस्पती उगवून अंतराळातील पोषक अन्न म्हणून वापरात आणत लाइफ सपोर्ट सिस्टीम्स अन् अंतराळवीरांच्या पोषणाकरता योगदान देण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

टार्डिग्रेड सर्वाइव्हल मॅकेनिजन्म्स:

टार्डिग्रेड्स (वॉटर बीयर) अंतराळाच्या स्थितीत कशाप्रकारे तग धरू शकतात, यावर अध्ययन केले जाणार आहे. यातून मानवी अंतराळ मोहिमेकरता बायोलॉजिकल लवचिकतेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.

पत्नीसाठीचा भावुक संदेश व्हायरल

शुभांशु यांनी अंतराळमोहिमेपूर्वी स्वत:ची पत्नी कामना शुक्ला यांच्यासाठी विशेष संदेश पोस्ट केला. त्यांनी सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. 25 जून रोजी सकाळी आम्ही हा ग्रह ओलांडून अंतराळात जाण्याची योजना आखली आहे. याचमुळे मी मोहिमेत सामील सर्व लोकांचे आभार मानतो. तसेच घरातील सर्व लोकांचे त्यांचे प्रेम अन् आशीर्वादासाठी आभार मानतो. कामनाला (पत्नी)एक उत्तम जोडीदार असल्याबद्दल विशेष धन्यवाद, असे शुभांशु यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी माझा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. या क्षणाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत होतो असे शुभांशु यांच्या आई आशा शुक्ला यांनी म्हटले आहे.

शुभांशु शुक्ला यांच्या पत्नी कोण?

शुभांशु यांच्या पत्नी कामना शुक्ला या डेंटिस्ट आहेत. शुभांशु आणि कामना हे शालेय जीवनापासून परस्परांच्या प्रेमात पडले होते. कौटुंबिक सहमतीद्वारे दोघांनी विवाह केला होता. इयत्ता तिसरीपासून आम्ही एकत्र शिक्षण घेतले आणि मग घनिष्ठ मित्र झालो. शुभांशु अत्यंत विनम्र अन् मृदुभाषिक आहेत. शुभांशु यांचे पहिले प्रेम नेहमीच आकाश राहिले असल्याचे कामना यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

अभिमानास्पद ठरणार कामगिरी

भारतीय वायुदलाचे ग्रूप

कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी बुधवारी स्वत:च्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय उ•ाण केल्यावर लखनौवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. अॅक्सिओम-4 मोहिमेच्या अंतर्गत शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहेत. शुभांशु शुक्ला हे 4 दशकांमध्ये अंतराळाचा प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. तर दुसरीकडे शुक्ला यांचे शहर लखनौमध्ये या अंतराळमोहिमेविषयी मोठी उत्सुकता दिसून येत असून शहरात अनेक ठिकाणी त्यांची पोस्टर्स झळकली.

शुभांशु यांना भारत-अमेरिका मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या समुहाचा सदस्य म्हणून निवडण्यात आले होते. इस्रोने शुभांशु शुक्ला यांना प्रमुख अंतराळवीर म्हणून निवडले होते. इस्रोने अमेरिकेच्या अॅक्सिओम स्पेस इंकसोबत करार केला होता. मोहिमेसाठी राष्ट्रीय मिशन असाइनमेंट बोर्डाने ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रूप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर यांची शिफारस केली होती.

शुभांश आहेत टेस्ट पायलट

1985 साली लखनौमध्ये जन्मलेले शुक्ला हे एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. 17 जून 2006 रोजी वायुदलाच्या कॉम्बॅट विंगमध्ये त्यांना नियुक्ती मिळाली होती. ते एक लढाऊ वैमानिक आणि टेस्ट पायलट आहेत. त्यांच्याकडे जवळपास 2 हजार तासांचा उड्डाण अनुभव आहे. त्यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 समवेत अनेक प्रकारच्या विमानांचे उड्डाण केले आहे.

कशी झाली निवड

शुभांशु शुक्ला यांची निवड इस्रो आणि भारतीय वायुदलाच्या इन्स्टीट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीनने (आयएएम) गगनयान मोहिमेसाठी केली होती. अंतराळ तंत्रज्ञान हे मूळ स्वरुपात विमानो•ाणाचा विस्तार आहे आणि टेस्ट पायलट्सना त्यांच्या प्राविण्याच्या आधारावर नेहमीच अशा गोष्टींचे सखोल अध्ययन करण्यासाठी पाचारण केले जाते. याचबरोबर योजनेनुसार घडत नसल्यास त्यांचे प्रावीण्य आणि अनुभव उपयोगी पडतो, असे राकेश शर्मा यांनी म्हटले आहे.

आमरस, गाजराचा हलवा

शुभांशु यांनी वैज्ञानिक उपकरणांसह स्वत:च्या आवडीची काही खासगी सामग्रीही अंतराळात नेण्यासाठी निवडली आहे. शुक्ला यांनी विशेषकरून भारतीय मिठाई घेतली आहे. अंतराळात मी आमरस, गाजराचा अन् मुगडाळीचा हलवा नेणार असून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात सहकारी अंतराळवीरांना तो खाऊ घालणार असल्याचे शुक्ला यांनी मोहिमेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

1 अब्ज लोकांची स्वप्नं माझ्यासोबत

एक्स-4 मिशनचे संचालन नासा, इस्रो आणि युरोपीय अंतराळ संस्थेच्या सहकार्याने एक खासगी कंपनी अॅक्सिओम स्पेसकडून करण्यात येत आहे. टीममध्ये अमेरिकेच्या वतीने कमांडर पॅगी व्हिटसन, पोलंडमधून स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीतल टिबोर कापू सामील आहेत. दोन आठवड्यांच्या मोहिमेदरम्यान अंतराळवीर सुमारे 40 वैज्ञानिक प्रयोग करतील, ज्यातील 7 इस्रोकडून डिझाइन करण्यात आले आहेत. मोहिमेवर रवाना होण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांनी ‘मी केवळ यंत्र आणि उपकरणेच नव्हे तर एक अब्ज लोकांच्या आशा अन् स्वप्नांना घेऊन जात आहे’ असे उद्गार काढले आहेत.

अंतराळजगतात भारताच्या उदयाचा संकेत

अॅक्सिओम 4 मिशनचे प्रक्षेपण हा भारतासाठी एक अद्भूत क्षण आहे. हे मिशन अंतराळ संशोधनात एक प्रमुख खेळाडू अन् जागतिक प्रकरणांमध्ये एक महत्त्वपूर्ण शक्तीच्या स्वरुपात भारताच्या उदयाचा संकेत असल्याचे उद्गार भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलिप ग्रीन यांनी काढले आहेत.

भारतासाठी गौरवाचा क्षण

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभांशु शुक्ला यांना अॅक्सिओम मिशन4 द्वारे अंतराळासाठीच्या प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी भारतासाठी अंतराळात एक नवा मैलाचा दगड स्थापित केला आहे. पूर्ण देश एका भारतीयाच्या अंतराळ प्रवासाकरता उत्साहित असून देशाला याबद्दल गर्व असल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.