Ratnagiri News : जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित ; दिनेश जैतापकर जैतापकर यांंचा विश्वास
जुवाठी गटातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार
राजापूर : गेली अनेक वर्षे राजकारणात कार्यरत असतानाही मी निव्वळ समाजोपयोगी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजसेवा हा छंद समजून मी आजवर कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात शक्य तेवढे योगदान देण्या प्रयत्न मी आजवर केला आहे. याची जाण माझ्या मतदार संघातील सर्व जनतेला आहे. त्यामुळे जुवाठी जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिनेश जैतापकर यांनी व्यक्त केला.
आजाया परिस्थितीनुसार जुवाठी मतदारसंघात कायापालट करणे गरजेचे बनले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष असा आहे की, जो आपल्या अस्मितेला न्याय देतो. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून प्रत्येक मराठी माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरीब व गरजू लोकांची सेवा करणे, मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम पक्षाने केले आहे. तसेच जुवाठी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकासकामे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार गणपत कदम तसा माजी जिल्हा परिषद म्हणून स्वतः मी व तात्या उर्फ रामचंद्र सरवणकर, भारती सरवणकर यांनी मार्गी लावलेली आहेत. मिळालेल्या फंडातून प्रत्येक गावा विकास केलेला आहे.
सन २०११ साली या जिल्हापरिषद गटातून मतदारांचा आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी विजय संपादन केला होता. त्यानंतर या विभागातील रस्ता, पाणी, शैक्षणिक अशा सर्वच बाबतीत मी काम करण्याचा प्रयत्न केला. या विभागात जनतेने सुचविलेली कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी त्यावेळी केला. आता अजूनही या विभागात अनेक विकासकामे प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरा जात आहे. मागच्या वेळेला केलेल्या कामी जाण येथील मतदारांना असून मतदारसंघात फिरत असताना त्याची मला अनुभूती येत आहे. त्यामुळे मतदार माझ्या पाठीशी ठाम असून माझा विजय निश्चित असल्याचे जैतापकर यांनी सांगितले.