आमचा संग्राम भारतीय राज्यव्यवस्थेशी !
राहुल गांधी यांच्या विधानामुळे नवा वाद, ही तर सोरोसची भाषा : भाजपचा पलटवार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आमचा संघर्ष केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी किंवा भारतीय जनता पक्षाशी नाही, तर तो भारतीय राज्यव्यवस्थेशी (इंडियन स्टेट) आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी तर जॉर्ज सोरोसचीच भाषा उघडपणे बोलत आहेत, असा जोरदार पलटवार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी या विधानावर केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा शब्दयुद्ध भडकले आहे.
राहुल गांधी यांनी हे विधान काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय मुख्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पक्षाच्या नेत्यांना उद्देशून भाषण करताना केले. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी झाले होते. या भाषणात त्यांनी अनेक विधाने केल्यामुळे राजकीय वादाचा भडका उडाला आहे. या विधानांचे पडसाद राजकीय आणि सामाजिक वर्तुळांमध्ये उमटत राहतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकी विधाने काय...
आम्ही नेमस्त आणि नियमबद्ध संघर्ष (फेअर फाईट) करीत आहोत, अशा समजुतीत कोणी राहू नये. यात कोणतीही सभ्यता (फेअरनेस) नाही. आम्ही केवळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या राजकीय संस्थांशी दोन हात करीत आहोत, असा तुमचा समज असेल, तर तुम्हाला परिस्थिती समजलेलीच नाही, असे म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांनी देशातील प्रत्येक संस्था बळकावलेली आहे. त्यामुळे आम्ही संघ, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राज्यव्यवस्थेशी लढत आहोत, अशी विधाने त्यांनी स्पष्ट भाषेत केली. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही त्यांनी संशय व्यक्त केला. तथापि, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी भाष्य केले नाही. मतदारांच्या वाढीस संख्येवर त्यांनी आक्षेप व्यक्त केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांविषयीची महत्वाची माहिती दाबून ठेवली, असा आरोप त्यांनी केला. आयोगाने मतदारसूची पारदर्शी ठेवलेली नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
भागवतांचे विधान देशद्रोही
ज्या दिवशी आयोध्येत भगवान रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्यादिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. हे विधान देशद्रोहपूर्ण (ट्रीझन) आहे. हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अवमान आहे हा सर्व भारतीयांचा अवमान आहे. इतर कोणत्याही लोकशाही देशात या विधानावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असती, असा आरोप गांधी यांनी केला.
भारतीय जनता पक्षाकडून पलटवार
काँग्रेसचा संघर्ष भारतीय राज्यव्यवस्थेशी आहे, हे राहुल गांधींचे विधान त्यांचे धोरण आणि कार्यपद्धती स्पष्ट करणारे आहे. भारतीय राज्यव्यवस्था भारताच्या राज्य घटनेने निर्माण केली आहे. ही घटना राहुल गांधी नेहमी खिशातून काढून लोकांना दाखवत असतात. याच घटनेने प्रस्थापित केलेल्या भारतीय राज्यव्यवस्थेशी ते संघर्ष करत असतील तर नुसती घटनेची प्रत शिखात बाळगून काय उपयोग आहे? असा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे. अमेरिकेचे भारतविरोधी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचीच भाषा राहुल गांधी यांच्या तोंडात आहे. भारतातील शहरी नक्षलवादीही त्यांचा लढा भारतीय राज्यव्यवस्थेशीच आहे, असे प्रतिपादन करतात. राहुल गांधींची भाषाही तशीच आहे. यावरुन ते कोणाकडे झुकले आहेत हे स्पष्ट होते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल गांधी यांना धारेवर धरले आहे.