For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी!

06:45 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘अभिरुप संसद’ म्हणजेच एक प्रतिकात्मक सार्वजनिक महाभियोग कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी खर्गे यांच्या निवासस्थानी प्रातिनिधिक संसदेसारखे दृश्य पाहायला मिळाले. खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देतानाच निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रसंगी विविध नेत्यांनी आपापली मते व्यक्त करत आमचा हा लढा लोकशाही वाचविण्यासाठी सुरू असल्याचा दावा केला.

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने शनिवारी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एक प्रतिकात्मक ‘जन महाभियोग’ कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला सुमारे 21 विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संसदीय स्वरूपात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी भूषवले. विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) दरम्यान मतदार याद्यांमधून नावे वगळल्याच्या आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. इंडिया अलायन्सच्या पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. एसआयआरच्या नावाखाली पात्र मतदारांना चुकीच्या पद्धतीने वगळले जात असल्याचा आणि निवडणूक आयोग आपली निष्पक्षता राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Advertisement

भाजपची जोरदार टीका

भारतीय जनता पक्षाने इंडिया अलायन्सच्या या ‘अभिरुप संसदे’वर तीव्र टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख करत या कार्यक्रमाचा कडक शब्दात समाचार घेतला. भारतात अराजकता पसरवण्याचा आपला हेतू साध्य न झाल्याने काँग्रेसने आपल्या लाडक्या राजकुमाराला खूश करण्यासाठी ‘बनावट संसद’ नावाचे एक ढोंगी नाटक आयोजित केल्याचे भाजपने म्हटले आहे.

सर्वसामान्यांनाही बोलण्याची संधी

‘अभिरुप संसद’मध्ये विरोधी आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांवरील त्यांच्या कृती आणि आरोपांबाबत एकजूट दिसले. या कार्यक्रमात ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती, त्यांचे जबाबही घेण्यात आले. या प्रातिनिधिक संसदेच्या अध्यक्ष बनलेल्या मीरा कुमारी यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली. सुशी अनिता जयस्वाल यांनाही संधी मिळाली. त्या म्हणाल्या की, त्या कोलकाताहून दिल्लीत आल्या आणि 2012 मध्ये दिल्लीत त्यांनी आपले ओळखपत्र मिळवले. तेव्हापासून त्या नियमितपणे मतदान करत आहेत. त्याचबरोबर बंगालचे इफ्तिखार अहमद यांनीही आपले मत मांडले. त्यांचे मतही रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

खर्गे यांचे भाजपसह आयोगावर गंभीर आरोप

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, 2014 पासून सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येक संभाव्य कट रचला गेला आहे. खासदारांचा घोडेबाजार, राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे आणि सरकारे पाडल्यानंतर आता मतांची चोरी होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि कार्यकाळ) कायदा, 2023, निवडणूक आयुक्तांना आजीवन संरक्षण प्रदान करतो. डिसेंबर 2023 मध्ये 145 विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर हा कायदा मंजूर करण्यात आल्याचे खर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या थेट निर्देशांनुसार निवडणूक आयोग चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आजचा हा प्रतिकात्मक कार्यक्रम कोणत्याही व्यक्तीविरुद्धच्या वैयक्तिक द्वेषापोटी नव्हे, तर या घटनात्मक संस्थेची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांच्या नि:पक्षपातीपणावर संशय

आम्हाला देशातील तरुणांसाठी न्याय हवा आहे. आमच्याकडे कडे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पुरावे आहेत. मतांची विभागणी करणारे हे देशाचे गुन्हेगार आहेत. त्यांच्या नि:पक्षपातीपणावर आम्हाला संशय असल्यामुळे मतचोरीविरोधात लढणे आवश्यक आहे.

- राहुल गांधी, काँग्रेस

विरोधी पक्षाने केलेले आरोप...

मतचोरीचा कट : निवडणुकीत फेरफार करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

13.2 कोटी मतदारांची नावे वगळली : मतदार यादीतून 13.2 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप आहे.

संसदेच्या मंजुरीशिवाय फॉर्म-6 मध्ये बदल : संसदेच्या मंजुरीशिवाय फॉर्म-6 चे नियम बदलण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला.

‘ईसीआयनेट’द्वारे मतदार याद्यांवर नियंत्रण : ‘ईसीआयनेट’द्वारे मतदार याद्यांवर नियंत्रण ठेवण्यात आल्याचा आरोपही काहींनी केला.

इतर दोन निवडणूक आयुक्तांकडे कानाडोळा : आयोगाच्या इतर दोन निवडणूक आयुक्तांची भूमिका मर्यादित करण्यात आल्याचा आरोपही आहे.

मोदी-शाह यांच्या सांगण्यावरून काम : मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप.

Advertisement
Tags :

.