आमचा लढा मोठेपणा सांगण्यासाठी कदापि नाही!
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : पहिले महायुद्ध विद्युत संघाची निवडणूक जिंकली. आता दुसरे महायुद्ध ग्राम पंचायत निवडणुका असून यामध्येही जारकीहोळींना पराभूत करतो, या माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विधानाचा खरपूस समाचार मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतला आहे. सर्वजण विजयी होणार या विश्वासानेच निवडणूक लढवित असतात. आमचा लढा हा आमचा मोठेपणा सांगण्यासाठी कदापि नसतो. 2028 साल सुरू झाल्यानंतर आमचे कर्तृत्व दाखवून देऊ, असे मंत्री जारकीहोळी यांनी म्हटले आहे. हुक्केरी येथे मंगळवारी (दि. 6) माध्यमांसमोर ते बोलत होते.
विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांचा विक्रम मोडीत काढला आहे. सिद्धरामय्या परिश्रमपूर्वक मुख्यमंत्री पदावर पोहोचले आहेत. ही सर्वांना अभिमानाची बाब आहे. संपूर्ण 5 वर्षे तेच मुख्यमंत्री असतील याबाबत त्यांनी स्वत:च तसे सांगितले आहे. आगामी अंदाजपत्रक तेच मांडतील. सर्व राजकीय पक्षांमध्ये गोंधळमय परिस्थिती असतेच. यात नाविन्य असे काहीच नाही. राज्याच्या नेतृत्व बदलाचा प्रश्न मुळीच नाही, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले. बळ्ळारीमध्ये घडलेल्या दंगल प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. डीसीसी बँक युनियन लीडरवर झालेल्या हल्ल्याबाबत तपास सुरू आहे. संपूर्ण चौकशीनंतर कोण दोषी हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.