For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

80 टक्के मते मिळवून आमचं पॅनेल सत्तेवर येणार

01:00 PM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
80 टक्के मते मिळवून आमचं पॅनेल सत्तेवर येणार
Advertisement

महेश देसाई यांचा दावा: जीसीएची आज निवडणूक : आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी प्राधान्य देणार

Advertisement

मडगाव : ‘आमच्या पॅनेलचा विजय पक्का आहे. क्लबांचा आमच्यावर विश्वास असून आज होणाऱ्या निवडणुकीत आमचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार’, असे चेतन देसाई आणि बाळू फडके पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश देसाई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 80 टक्के क्लबांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे देसाई म्हणाले. माझं मंडळ क्रिकेटसाठी साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आणि धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी प्राधान्य देणार आहे. सर्व सलंग्नीत क्लबांचा आम्हाला पाठिंबा आहे. सकाळी 11 वाजल्यापासून आमच्या मतांची ‘बॅटिंग’ सुरू होणार असल्याचे गोव्याचे माजी रणजीपटू आणि मागील निवडणुकीत थोड्याशा फरकाने पराभूत झालेले महेश देसाई म्हणाले. माझे प्रतिस्पर्धी आणि अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर हे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत. दोन क्रीडा संघटनांवर ते राहू शकत नाहीत. माझ्या क्लबांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. मात्र क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे आणि क्लबांच्या पाठिंब्याने सरळ लढत देऊन सामोरे जाण्याचे मी ठरविले, असे महेश देसाई म्हणाले.

आमचे पॅनेल अनुभवी : विपुल फडके

Advertisement

आमचे पॅनेल हे अनुभवी आणि कित्येक वर्षे क्लब क्रिकेटची सेवा केलेले आहेत. महेश देसाईच्या व्यतिरिक्त अनंत नाईक, महेश बेकी, परेश फडते, अब्दुल माजीद आणि तुळशिदास शेट्यो यांनी क्लबस्तरीय क्रिकेट खेळले आहे, असे जीसीएचे विद्यमान अध्यक्ष विपुल फडके म्हणाले. गोव्याच्या क्रिकेटला उच्च दर्जा मिळवून देण्यासाठी हे मंडळ कार्यरत राहणार असून ग्रासरूट क्रिकेट बळकट करण्यावर आमचा अधिक भर असेल असे फडके म्हणाले.

रोहन गावस देसाई हे ‘डिक्टेटर’

परिवर्तन पॅनेलचे सर्वेसर्वा रोहन गावस देसाई हे हुकूमशहा आहेत. ते कोणत्याही क्लबाचे प्रतिनिधी नाही. माझ्या खोर्ली इलेव्हनमधून रोहनला मागील निवडणुकीत सचिवपदी बिनविरोध निवडून दिले. मात्र त्यानंतर त्याने आपली वेगळी बाजू दाखवून दिली. स्टेडियमसाठी काम करण्याची रोहनने ग्वाहीही दिली मात्र सर्व बाजूने रोहन अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी विपुल फडकेने केला. परिवर्तन पॅनेलमध्ये मागच्या कार्यकारी मंडळातील दोघेजण आहेत. क्रिकेटबाबत त्यांचे योगदान काय आहे, असा सवाल करून आमच्या पॅनेलमध्ये स्थान मिळणार नाही, हे कळल्याने आपलेचं ‘परिवर्तन’ करण्यासाठी ते दुसऱ्या पॅनेलमध्ये गेल्याची टीका फडके यांनी केली.

आमच्या पॅनेलमध्ये सर्व भागांना प्रतिनिधीत्व

आमच्या पॅनेलमध्ये तिसवाडी, बार्देश, सांखळी, मुरगाव, सालसेत आणि फोंडा या भागाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. समतोल असे आमचे पॅनेल असल्याचे फडके म्हणाले. प्रत्येक क्लबांना आम्ही व्यक्तिशा भेटलो असून सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असे फडके म्हणाले.

क्रिकेट स्टेडियम धारगळीतच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हा धारगळीतच होणार आहे. मनोहर पर्रीकर यांनी क्रीडा नगरीसाठी धारगळची जागा निवडली होती. जीसीएच्या आमसभा तसेच खास आमसभेतही सर्वच्या सर्व 107 क्लबांनी धारगळ येथेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावा, यासाठी ठरावही घेतले आहेत. रोहन देसाई स्टेडियमच्या संदर्भात ज्या 60 कोटींच्या गोष्टी करतात त्यात काहीही तथ्य नसून धारगळ, वन-म्हावळींगे तसेच थिवी मैदानांच्या बाबतीत आपल्या माहितीनुसार असलेल्या नोंदीप्रमाणे 20 कोटींचा खर्च झाला आहे, असे फडके म्हणाले. आपले मंडळ तीन वर्षांच्या कार्यकाळात धारगळ स्टेडियम पूर्ण करणार असून वन म्हावळींगेत बेंगलोर येथील अलूर येथे असलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ तसेच सामने खेळण्यासाठी मैदाने, सरावासाठी खेळपट्ट्या तयार करणार असल्याचे विपुल फडके म्हणाले.

रोहन जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीत नाही

रोहन गावस देसाई हे कुठल्याही क्लबचे सदस्य नाहीत तसेच जीसीएच्या व्यवस्थापकीय मंडळातसुद्धा नाही. त्यामुळे त्याचे नाव बीसीसीआयच्या बैठकीसाठी पाठविले नाही, असे स्पष्टीकरण देताना फडके म्हणाले. जीसीएच्या घटनेने असे नोंद केलेलेही नाही. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन, पुढे काय करायचं हे लवकरच ठरविणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.