आमचे भारतीय मित्र सुरक्षित, चिंता नको!
होर्मुझचे भविष्य आम्ही अन् ओमान ठरवू : इराण
पश्चिम आशियातील युद्धाच्या 34 व्या दिवशी इराणने भारतासंबंधी महत्त्वाचा संदेश दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत काय होणार याचा निर्णय इराण आणि ओमान घेईल, अन्य कुणी नाही. आमचे भारतीय मित्र सुरक्षित हातांमध्ये असून त्यांच्यावरुन कुणाला कोणतीच चिंता करण्याची आवश्यकता नाही असे इराणने म्हटले आहे. सद्यकाळात इराणमध्ये आणि पर्शियन उपसागरात जहाजांवर अनेक भारतीय अडकून पडले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीचे भविष्य केवळ इराण आणि ओमान ठरवतील. भारतीय सुरक्षित हातांमध्ये आहेत, चिंता करण्याची बाब नाही असे दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने नमूद केले आहे.
अमेरिकेच्या दाव्यांवर प्रत्युत्तर
होर्मुझ सामुद्रधुनी पूर्ण स्वरुपात निर्णायक नियंत्रणात असल्याचे वक्तव्य यापूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरने केले होते. होर्मुझ सामुद्रधुनी ‘दृढता आणि प्रभुत्वा’सोबत आमच्या नौसैनिकांच्या नियंत्रणात आहे आणि कुठलाही दबाव तसेच तडजोडीत शत्रूंसाठी खुली केली जाणार नसल्याचे आयआरजीसीचे सांगणे आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वाकडून शस्त्रसंधीची मागणी करण्यात आल्याचा दावा केला होता.
भारत निष्ठा, मानवता अन् नैतिकतेची भूमी
याचदरम्यान भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारताला ‘निष्ठा आणि मानवते’ची भूमी संबोधिले आहे. तसेच भारत ही नैतिकतेची भूमी असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.